महाराष्ट्र निवडणूक २०१९: आघाडीचा पराभव झाल्यास त्याला काँग्रेसच जबाबदार, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 22:32 IST2019-10-23T22:31:13+5:302019-10-23T22:32:45+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खटके उडू लागले आहेत.

महाराष्ट्र निवडणूक २०१९: आघाडीचा पराभव झाल्यास त्याला काँग्रेसच जबाबदार, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खटके उडू लागले आहे. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा पराभव झाल्यास त्याला केवळ काँग्रेसच जबाबदार असेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी केली आहे.
काँग्रेसवर टीका करताना माजिद मेमन म्हणाले की, ''संपूर्ण निवडणुकीत ना काँग्रेस दिसून आली, ना सोनिया गांधी, ना प्रियंका गांधी दिसल्या. राहुल गांधी यांनी मुंबईत सभा घेतल्या, पण त्या सभेलाच काँग्रेसचे काही नेते अनुपस्थित राहिले. त्यामुळे या निवडणुकीत जर आमचा पराभव झाला तर त्याला काँग्रेसच्या नेत्यांमधील हा अंतर्गत वादच जबाबदार असेल.''
राज्यामध्ये शरद पवार यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. पण काँग्रेसने मात्र संपूर्ण निवडणुकीत गाफिलपणा दाखवला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबईतच काही दौरे केले. काँग्रेसच्या इतर नेत्यांनी काहीच मेहनत घेतली नाही. विरोधी पक्षांचा विचार केल्यास एकट्या शरद पवार यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी जनादेश दिलेला नाही. स्वबळावर लढणे शक्य नव्हते. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी करणे ही आमची अपरिहार्यता होती. दुसरीकडे या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी मात्र खूप मेहनत घेतली.'' असेही मेनन यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. त्यानंतर आलेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून राज्यात भाजपा आणि शिवसेना महायुतीची सत्ता येणार असल्याचा कल दर्शवला होता.