शिवसेना आमदारांच्या हालचालींवर 'मातोश्री'चं लक्ष; प्रत्येक शिवसैनिकाला दिली 'ही' जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 10:34 AM2019-11-07T10:34:46+5:302019-11-07T11:02:40+5:30
भाजपाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली करत असताना अनेक आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्रिपदावर ठाम असलेली शिवसेनेचा भाजपावर दबाव वाढलेला आहे. कोणत्याही परिस्थिती राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री येणार असा दावा शिवसेना नेते संजय राऊत करत आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका मी रोज मांडत असतो असंही त्यांनी सांगितले आहे.
भाजपाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली करत असताना अनेक आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अनेकांना विविध प्रलोभने दाखवून भाजपाकडे वळविण्याचं काम सुरु आहे. शिवसेना आमदारांची महत्वपूर्ण बैठक मातोश्रीवर होत आहे. उद्धव ठाकरे या सर्व आमदारांना पुढील रणनीती कळविण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार फुटू नये यासाठी विशेष खबरदारी मातोश्रीने घेतल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना आमदार फुटू नये यासाठी एका आमदारामागे एक विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. आमदारांना कोण भेटतं, कोणाचे फोन येतात, काय बोलणं होतं याकडे हे जबाबदार शिवसैनिक बारीक लक्ष ठेवणार आहेत. तसेच याची माहिती थेट मातोश्रीवर देण्यात येणार असल्याची योजना करण्यात आलेली आहे.शिवसेनेचे कोणतेही आमदार फुटणार नाहीत, तसेच आमच्या आमदारांच्या आसपास फिरकायचीही हिंमत कोणाची नाही असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.
मागच्या सत्तेचा वापर पुढच्या सत्तेसाठी ‘थैल्या’ ओतण्यात होत आहे, पण शेतकऱयांच्या हाती कुणी दमडा ठेवण्यास तयार नाही. म्हणूनच राज्यातील शेतकऱयांना शिवसेनेचे राज्य हवे आहे. हे आम्ही फक्त मुद्दय़ांचेच बोलत आहोत. कुणी गुद्दय़ांवर येणार असेल तर आम्ही त्यालाही उत्तर देऊ. गुंडांचा धाक व पैशांचा प्रसाद कोणी वाटणार असेल तर मर्द मरगट्टा मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. नैतिक मूल्यांवर जर राजकारण आधारले नाही तर अन्याय, भ्रष्टाचार आणि अत्याचार यांना राजकारणाचे संरक्षण मिळतच राहणार. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवून कुणालाही राज्य आणता येणार नाही. शिवसेना येथे तलवार घेऊन उभीच आहे असा गंभीर इशारा सामना अग्रलेखातून शिवसेनेने दिला आहे
महत्वाच्या बातम्या
...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणा
सत्तेचा वापर करून ‘फोड झोड’ करणार असाल तर खबरदार, अन्यथा...
वेगवान राजकीय हालचाली, भाजपचा पुन्हा एकदा 'प्लॅन बी'
राज्यातील राजकीय घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने