Maharashtra Election 2019: ठोस मुद्द्याअभावी गाजलेला प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 03:35 AM2019-10-20T03:35:00+5:302019-10-20T05:33:07+5:30

Maharashtra Election 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसीतील सभेने शुक्रवारीच मुंबईतील प्रचाराची सांगता झाली.

Maharashtra Election 2019: Propaganda that lacks solid points | Maharashtra Election 2019: ठोस मुद्द्याअभावी गाजलेला प्रचार

Maharashtra Election 2019: ठोस मुद्द्याअभावी गाजलेला प्रचार

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसीतील सभेने शुक्रवारीच मुंबईतील प्रचाराची सांगता झाली. मुंबईच नव्हे, तर ठाणे, पालघर, रायगडमधील प्रचारात स्थानिक प्रश्नांची फारशी चर्चा झाली नाही. पालघरमध्ये वाढवण बंदराचा मुद्दा तेवढा गाजला, अन्यत्र मात्र कोणत्याही ठोस मुद्द्याचा समावेश नसतानाही आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवत प्रचार पार पडला.

मुंबईच्या ३६, ठाण्याच्या १७, पालघरमधील सहा आणि रायगडच्या सात मतदारसंघांत शनिवारी मोजक्या जाहीर सभा वगळता उमेदवारांनी शेवटचा दणका देण्यासाठी बाईक रॅली, पदयात्रा, प्रचारासाठी फिरवलेली वाहने, सोशल मीडियावरील मजकुराचा भडीमार यांचा जोर लावला. मतदानापूर्वीच्या छुप्या प्रचाराची धावपळ आता सुरू झाली असली, तरी मोठमोठ्या तोफा आता थंडावल्या आहेत.

याद्या जाहीर होईपर्यंत मुंबई परिसरात आघाडी, युती आणि मनसेच्या उमेदवारांच्या प्रचार सुरू झालाच होता. ठाकरे कुटुंबातील पहिलावहिला उमेदवार म्हणून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने मुंबईच्या निवडणुकीत त्यांच्या प्रचाराची चर्चा रंगली. त्याचवेळी मातोश्रीच्या अंगणात झालेल्या बंडखोरीचीही चर्चा शेवटपर्यंत रंगली. अखेर तृप्ती सावंत यांना सेनेतून काढून टाकण्यात आले. विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्याचा प्रचारावर परिणाम होईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात त्यांची मनधरणी करण्यात भाजप नेतृत्त्वाला यश आले.

शिवसेनेच्या मुंबईतली प्रचाराची धुरा युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याच खांद्यावर होती, तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तंबू एकखांबी तोलून धरला. काँग्रेससाठी राहुल गांधी यांच्या दोन सभा वगळता फार गाजावाजा झाला नाही; तर राष्ट्रवादी काँग्रेसकरता शरद पवार यांनी मुंबईत माफक प्रचार केला. विशेष म्हणजे, मुंबईशी निगडित कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर या प्रचारादरम्यान चर्चा झालीच नाही. आरेतील झाडांचा मुद्दाही काही काळ चर्चिला गेला, पण तोही तडीस गेलाच नाही.

ठाण्यात चर्चा बंडखोरीची

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या प्रचारात सर्वाधिक गाजली, ती कल्याण पूर्वमधील शिवसेनेची, कल्याण पश्चिमेतील आणि मीरा-भार्इंदरमधील भाजपची बंडखोरी. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेत असलेली नाराजी कशीबशी दूर करण्यात पक्षनेतृत्वाला यश आले. युतीतील धुसफूस सतत वेगवेगळ््या मार्गाने समोर येत गेली. राष्ट्रवादी - मनसेच्या ढुप्या युतीची चर्चा जेवढी ठाणे शहरात झाली, तेवढी अन्यत्र झाली नाही. मनसेने ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या मतदारसंघांवर नेहमीपेक्षा अधिक लक्ष दिल्याचे जाणवले. उल्हासनगरमध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी या लढतील आयलानी विरूद्ध कलानी अशा संघर्षाची धार पाहायला मिळाली.

पालघर : वबिआ-सेनेत लढत

पालघर : पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडी विरू्ध शिवसेना अशी थेट लढत तीन मतदारसंघांत आहे. त्यांच्यातील संघर्षच प्रचारात गाजला. बोईसर, नालासोपारा, विक्रमगड मतदारसंघांत युतीतील नाराजी उघडपणे समोर आली. डहाणूत मात्र भाजप विरूद्ध माकप असा निकराचा संघर्ष दिसून आला.

रायगडची चर्चा तटकरेंभोवती

रायगड : रायगड जिल्ह्यात शेकाप-राष्ट्रवादीची आघाडी आणि या आघाडीसोबत राहतानाच दोन ठिकाणी काँग्रेस मैत्रीपूर्ण लढते आहे. उरणमध्ये भाजपच्या उमेदवाराने केलेली बंडखोरी प्रचारात गाजली. श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश आणि प्रथमच विधानसभेच्या रिंगणात आदिती तटकरे यांनी केलेला प्रवेश चर्चेचा ठरला.

Web Title: Maharashtra Election 2019: Propaganda that lacks solid points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.