महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात देणंघेणं असतंच; जे ज्याच्या हक्काचं आहे, ते त्यांना मिळेल - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 05:04 PM2019-11-13T17:04:09+5:302019-11-13T17:06:23+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
मुंबई: राजकारणात देणंघेणं असतंच, भाजपाने आम्हाला काही हक्काचं दिलं नाही, म्हणून आम्ही इतरांना देणार नाही असं नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्याच्या हक्काचं आहे त्यांना नक्की देतील असं मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याचे ठरले असताना देखील भाजपाने त्यास नकार दिला हा भाजपाचा स्वार्थच असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्यास राज्य वेगात पुढे चालण्यास मदत होईल. तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाच्या विचारधारा भिन्न असल्या तरी तिन्ही पक्ष समान कार्यक्रमावर एकत्र येण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
संजय राऊत यांना लीलावती रुग्णलयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपावर निशाणा साधला. यावेळी राज्यपालांनी सर्वांवर अन्याय केला असा आरोप संजय राऊत यांनी केला. राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणाऱ्या राज्यपालांनी सर्वच पक्षांवर अन्याय केला आहे, मुख्यमंत्री आमचाच होईल असे म्हणणाऱ्या आणि १५ दिवसांनी असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपाचे कान राज्यपालांनी धरायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, भाजपाने शब्द देऊनही पाळला नाही. याशिवाय, मध्यावधी निवडणुकीचा दावा नाकारत भाजपा इतरांना सत्ता स्थापन करु देत नसल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.