राज्यात महाशिवआघाडीचे संकेत, संजय राऊतांकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 12:03 PM2019-11-10T12:03:45+5:302019-11-10T12:04:35+5:30
मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेतील मतभेद विकोपला गेल्यानंतर आता राज्यात नवी सत्तासमीकरणे जुळण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेतील मतभेद विकोपला गेल्यानंतर आता राज्यात नवी सत्तासमीकरणे जुळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. एकीकडे राज्यपालांनी भाजपाला मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले असले तरी दुसरीकडे भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच आणि काँग्रेस अशी आघाडी निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक केले. तसेच काँग्रेस ही काही राज्याची दुश्मन नसल्याचेही सांगितले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज एकीकडे भाजपावर टीका केली तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबत मात्र नरमाईची भूमिका स्वीकारली. ''राज्यात स्थिर सरकार यावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस ही काही राज्याची दुश्मन नाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्याच्या विकासात योगदान दिले आहे. आमच्यात काही प्रश्नांवरून मतभेद आहेत. तसे ते भाजपासोबतही आहेत. देशासंबंधीच्या काही प्रश्नांबाबत भाजपा आणि आमची भूमिका वेगवेगळी होती.'' असे संजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी राऊत यांनी बेळगाव प्रश्नाचाही उल्लेख केला. बेळगाव, कारवार या मराठी भाषकांच्या सीमाप्रश्नाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये एकमत आहेत. त्यासाठी या पक्षांचे नेते आग्रही भूमिका घेतात. मात्र बेळगाव सीमाप्रश्नी भाजपाने कधीही आग्रही भूमिका घेतलेली नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.