मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 04:08 PM2024-10-17T16:08:25+5:302024-10-17T16:10:13+5:30
काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येणार आहे. ८४ जागांबाबत उमेदवारी निश्चित झाली असून २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आता सर्वांचं लक्ष महायुती आणि मविआच्या जागावाटपावर लागलं आहे. महाविकास आघाडीत आतापर्यंत २१६ जागांवर एकमत झालं आहे. तिढा असलेल्या जागांवर तोडगा काढण्यासाठी मविआ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. या बैठकीत संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, सतेज पाटील हे उपस्थित आहेत. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला आज बैठक सुरू आहे. त्यात मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे.
काँग्रेस १५, ठाकरेसेना १८ आणि राष्ट्रवादी २ आणि समाजवादी पार्टीला १ जागा देण्यावर सहमती झाली आहे. त्याशिवाय कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर अद्याप पेच आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होऊ शकते असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येणार आहे. ८४ जागांबाबत उमेदवारी निश्चित झाली असून २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्याचदिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते.
समाजवादी पक्षानं केली १२ जागांची मागणी
महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट समाजवादी पक्षाला विचारात न घेता विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार असतील तर ते समाजवादी पक्षाला महाविकास आघाडीचा भाग मानत नाहीत असा अर्थ होतो. चर्चेविना उमेदवारांची घोषणा करणे चुकीचे ठरेल. महाविकास आघाडीचा हेतू धार्मिक शक्तींविरोधात लढणे आणि पुरोगामी पक्षांना ताकद देणे हे आहे असं त्यांनी सांगितले.
तर महाराष्ट्रात इंडिया आघाडीने एकत्र निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. मी शुक्रवारी महाराष्ट्रात जातोय, तिथे याबाबत चर्चा होईल. इंडिया आघाडीसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमचे राज्यात दोन आमदार आहेत. आम्हाला आशा आहे की, यावेळी जास्त जागा मिळतील. आम्ही पूर्ण ताकदीने इंडिया आघाडीसोबत उभे राहू असं विधान सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले आहे.