Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपदावरून वाद अद्यापही कायम, अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याची काँग्रेसची तयारी

By अतुल कुलकर्णी | Published: November 29, 2019 06:52 AM2019-11-29T06:52:13+5:302019-11-29T06:52:31+5:30

विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यास काँग्रेस तयार असली तरी त्यांना त्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. मात्र सतत बदल करणे योग्य नाही, तुम्हीच अध्यक्षपद मागून घेतले होते, तेव्हा पुन्हा त्यात बदल करू नका, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: Congress ready to hand over the post of Speaker to NCP | Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपदावरून वाद अद्यापही कायम, अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याची काँग्रेसची तयारी

Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपदावरून वाद अद्यापही कायम, अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याची काँग्रेसची तयारी

Next

- अतुल कुलकर्णी
मुंबई : विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यास काँग्रेस तयार असली तरी त्यांना त्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. मात्र सतत बदल करणे योग्य नाही, तुम्हीच अध्यक्षपद मागून घेतले होते, तेव्हा पुन्हा त्यात बदल करू नका, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे अध्यक्षपद व उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. काँग्रेसने मात्र दोन उपमुख्यमंत्री करावे, विधानसभेचे अध्यक्षपद राष्टÑवादीने घ्यावे, असा तोडगा सुचवला आहे.

महाविकास आघाडीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत एकच उपमुख्यमंत्रिपद असेल व विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल, असा निर्णय झाल्याचे राष्टÑवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले होते. मात्र बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभरात बऱ्याच घडामोडी झाल्या. काँग्रेसने अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित केले होते. अशोक चव्हाणही त्यासाठी उत्सुक होते. दोघेही माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना अध्यक्षपद सन्मानजनक वाटत होते.

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला हवे असल्याने, त्यांनी तीन नावे सुचवावीत. त्यातील एक नाव सहमतीने ठरवू, असे राष्टÑवादीने सांगितले आहे. आम्हाला अध्यक्षपद देत असाल, तर पृथ्वीराज चव्हाण हेच एकमेव नाव आमच्याकडे आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. त्यावर राष्टÑवादीने विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाचा दाखला दिला. त्यांच्या सांगण्यावरून राष्टÑवादीने तेव्हा तीन नावे सुचवली होती. त्यातून अरुण गुजराथी यांचे नाव अंतिम केले होेते, पण काँग्रेसला हे मान्य नाही.

अध्यक्षपद एकाकडे आणि उपमुख्यमंत्रिपद एकाकडे ठरलेले असताना आता त्यास नवे वळण नको, असे राष्टÑवादीचे म्हणणे आहे. पण उपमुख्यमंत्रिपदही काँग्रेसला हवे आहे. कारण सरकारच्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची छायाचित्रे आणि नावे असतात. उपमुख्यमंत्रिपद घेतले नाही तर कोणत्याही जाहिराती आपले नाव, छायाचित्र दिसणार नाही. पर्यायाने हे सरकार शिवसेना-राष्टÑवादीचे असल्याचा समज होत राहील. त्यामुळेच अध्यक्षपद सोडण्यास काँग्रेस

तयार झाली आहे. पण ते राष्टÑवादीला मान्य नाही. या काळात अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते दोघांनाही हवे आहे.
अध्यक्षपद तुम्ही घ्या, त्या बदल्यात एक कॅबिनेट मंत्रिपद आम्हाला द्या, असेही काँग्रेसने सांगितले आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १६ तर राष्टÑवादीला उपमुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे असे ठरले आहे. पण आता काँग्रेसला १३ मंत्रिपदे हवी आहेत.

नगरविकास, महसूल, वित्त यापैकी एक हवे

पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्षपद मिळत नसेल तर त्यांना नगरविकास, वित्त किंवा महसूल यापैकी एक खाते मिळावे, अशी अपेक्षा आहे. आपण मुख्यमंत्री होतो. त्यामुळे मंत्रिपदाबरोबर या तीनपैकी एक खाते मिळाले तर चांगले काम करता येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसश्रेष्ठींना सांगितल्याचे समजते. दोन दिवसांत शरद पवार आणि अहमद पटेल याबाबत निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Congress ready to hand over the post of Speaker to NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.