भाजपतील धुरिणांचा अजितदादांबद्दल अंदाज कसा फसला, हाच प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:09 AM2019-11-27T06:09:54+5:302019-11-27T06:10:35+5:30
अजित पवार बंड तर करतात पण भावनिक साद घातली गेली की ते परत फिरतात हा पूर्वानुभव असूनही भाजपने त्यांच्या साथीने सत्ता स्थापन करण्याचा डाव का रचला
मुंबई : अजित पवार बंड तर करतात पण भावनिक साद घातली गेली की ते परत फिरतात हा पूर्वानुभव असूनही भाजपने त्यांच्या साथीने सत्ता स्थापन करण्याचा डाव का रचला, तो फसेल याची पूर्वकल्पना भाजपमधील धूरिणांना नव्हती का, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीआधी संपूर्ण फोकस ईडीच्या चौकशीवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर असताना अचानक अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन बंडाचे निशाण फडकविले होते. ते ‘नॉट रिचेबल’ झाले पण त्यांच्यातील बंडोबा काही तासांतच थंड झाला ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या सावलीत परत गेले. त्यावेळीही भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय झाले. राज्यातील सत्तास्थापनेच्या विलक्षण घडामोडींना अचानक टिष्ट्वस्ट तेव्हा आला जेव्हा शनिवारी सकाळी सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस. मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार बहुसंख्येने असल्याचा फुगा फुटला.
आता तीन पक्षांचे सरकार असताना भाजपला स्वत:ची ताकद टिकवून ठेवावी लागेल. ग्राम पंचायतींपासून महापालिकांपर्यंत पाच वर्षांत मोठे यश मिळविले. तेव्हा सत्ता होती. आता सत्ता नसताना ते यश टिकविण्याचे आव्हान असेल.