महाराष्ट्र निवडणूक 2019 : शरद पवारांचा 'पॉवर'फूल गेम; 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी घडविणार इतिहास?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 01:22 PM2019-11-13T13:22:51+5:302019-11-13T13:23:34+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांकडून शरद पवारांना टार्गेट करण्यात येत होतं.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा गुंता सुटत नसल्याने राज्यपालांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यंदाची विधानसभा निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी महत्वाची होती. अनेक आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर विरोधकांना राज्यात किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होतं. भाजपा-शिवसेनेने मेगाभरती करत अनेक विरोधी बाकांवरील आमदारांना पक्षात घेतलं होतं. त्यामुळे कुठेतरी शरद पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपा-शिवसेनेने केला होता.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांकडून शरद पवारांना टार्गेट करण्यात येत होतं. काँग्रेसचं राज्यात अस्तित्व उरणार का? यावरही प्रश्नचिन्ह होतं. भाजपाचा आत्मविश्वास राज्यात पुन्हा महायुती २२० पार जाणार असं सांगत होता. इतकचं नाही तर लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले सातारचे खासदार उदयनराजे भोसले हेदेखील पक्षाला रामराम करत भाजपात गेले. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. मात्र ८० वर्षाचे शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात मागे हटायला तयार नव्हते. संघर्षाची लढाई शरद पवारांनी जिद्दीने लढून राज्यात एक करिष्मा घडविला. विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागा मिळाल्या. मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा विरोधी पक्षांना मिळतील असा विश्वास एकाही राजकीय विश्लेषकाला नव्हता. मात्र शरद पवार यांनी ही जादू करुन दाखविली.
निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात तणाव वाढला. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ही शिवसेनेची आग्रही मागणी भाजपाने फेटाळून लावली त्यामुळे या सत्तासंघर्षात शिवसेना-भाजपाचं आमचं ठरलंयपासून आमचं बिनसलंय असचं चित्र निर्माण झालं. भाजपाच्या घटलेल्या जागा पाहून शिवसेनेनेही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत इतर पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले. दबावाचा भाग म्हणून संजय राऊतांनी अनेकदा शरद पवारांची भेटदेखील घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनेही आपला पॉवर गेम खेळला.
शरद पवारांनी आम्हाला जनतेने विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला आहे असं सांगत राहिले. मात्र भाजपाने सत्तास्थापनेस असमर्थता दाखविल्यानंतर अधिकृतरित्या शिवसेनेने आघाडीशी बोलणी सुरु केली. या निवडणुकीत शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४ तर काँग्रेस ४४ जागांवर विजयी झालेली आहे. राज्यात नवीन समीकरण तयार होत असेल तर त्यात सत्तेचा वाटा कसा असणार यावर चर्चा घडत गेली. मुख्यमंत्रिपदावर शिवसेना आक्रमक असली तरी महाआघाडीचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागली आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रम या धर्तीवर एकत्र येण्याचं ठरविलं तर आघाडीला सत्तेत सामावून घेताना त्यांचे महत्व काय असणार यावर चर्चा झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात महाशिवआघाडी उदयास आली तर पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, त्यानंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या गेममुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून राज्यात १५ वर्ष काँग्रेसच्या साथीने राष्ट्रवादी सत्तेत आहे. एकेकाळी काँग्रेसपेक्षा जास्त संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं होतं. मात्र यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला मुख्यमंत्री होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महत्वाच्या बातम्या
मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, भीती बाळगू नका - शरद पवार
नववर्षापूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल; अजित पवारांचे सूचक विधान
शरद पवारांनाच ठाऊक आहे 170 आमदार येणार कुठून; संजय राऊतांचं सूचक विधान
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणं हे चिंताजनक; छ. संभाजीराजेंनी सांगितला उत्तम 'पर्याय'
अजित पवारांकडून नारायण राणेंना खुलं चॅलेंज; एकही आमदार जर फुटला तर...