Maharashtra Government: उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातून दोन्ही चव्हाणांचा पत्ता कट?, 'या' नेत्यांना मिळणार संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 04:19 PM2019-11-28T16:19:30+5:302019-11-28T16:24:43+5:30
उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येते.
मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे सरकार स्थापन करणार आहेत. या 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सहा वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येते. यामध्ये राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांची नावे जवळपास निश्चित झाली आहे. मात्र, काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सुद्धा शपथ घेतील असे बोलले जात होते. पण, आदर्श घोटाळ्याप्रकरणी नव्या चौकशीच्या फेऱ्यामुळे अशोक चव्हाण यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.
तसेच, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचाही मंत्रीपदाचा अद्याप मार्ग मोकळा झाला नाही. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याऐवजी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांची नव्या मंत्रिमडळात वर्णी लागण्याची शक्यता असून आज हे दोन्ही नेते शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आदर्श घोटाळा 2010 मध्ये उघडकीस आला होता. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर झाला होता. त्यानंतर त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. मात्र, आता आदर्श सोसायची घोटाळ्याची पुन्हा सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरु केली आहे.