Maharashtra Government: भाजपा खासदार प्रताप चिखलीकरांनी घेतली अजितदादांची भेट; राजकीय चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 09:41 AM2019-11-30T09:41:14+5:302019-11-30T09:45:42+5:30
तत्पूर्वी आज सकाळी भाजपा खासदार प्रताप चिखलीकर यांनी अजित पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली
मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारवरील बहुमताचा ठराव आज विधानसभेत मांडला जाणार आहे. त्यामुळे अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामुळे प्रत्येक्ष पक्षांनी आपले आमदार सुरक्षितस्थळी ठेवले होते. गुरुवारी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर आज विधानसभेत त्यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
तत्पूर्वी आज सकाळी भाजपा खासदार प्रताप चिखलीकर यांनी अजित पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरु होती. बहुमताच्या दिवशी अशाप्रकारे भाजपा नेत्याने अजित पवारांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. प्रताप चिखलीकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र या भेटीनंतर अजित पवारांनी माध्यमाशी बोलताना ही सदिच्छा भेट होती असं सांगितले.
अजित पवार म्हणाले की, माध्यमांनी गैरसमज करु नका, प्रताप पाटील चिखलीकर भाजपमध्येच आहेत, मी राष्ट्रवादीतच आहे, आम्ही केवळ सदिच्छा भेट म्हणून भेटलो, कोणत्याही पक्षात शत्रू नाहीत, एकमेकांना भेटू शकतो, विश्वासदर्शक ठरावाची अजिबात चर्चा नाही, तो ठराव लाईव्ह असेल, संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे 170 चा आकडा गाठू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घ्यायला गेले आहेत.
Leaders of Maha Vikas Aghadi to meet at Vidhan Bhavan at 9.30 am today over confidence vote and Speaker election https://t.co/Z0By1cAKSj
— ANI (@ANI) November 30, 2019
22 नोव्हेंबरच्या रातोरात अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घातली त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला होता, शरद पवार यांच्या कुटुंबासह राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याचं चित्र निर्माण झालं. अजित पवारांच्या बंडाने बहिण सुप्रिया सुळेही भावूक झाल्या. अजित पवार समर्थकांनी दादांचा निर्णय योग्यच आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या, मात्र 4 दिवसात अजित पवारांची मनधरणी करुन कुटुंबाने पक्षात आणि परिवारात पडणारी फूट रोखली. अजित पवार पक्षात पुन्हा परतले अन् राजकारणात सक्रीय असल्याचं दाखवून देत आहे. पण अजित पवारांच्या बंडामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि नेत्यांची मागणी असली तर हा निर्णय सर्वस्वी शरद पवारांवर अवलंबून आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.