Maharashtra Government: शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा दिल्लीतून होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 06:16 AM2019-11-13T06:16:58+5:302019-11-13T06:18:53+5:30
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सहमती दर्शविली
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सहमती दर्शविली असली, तरी याबाबतची घोषणा दिल्लीतून होणार आहे, शिवाय मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यावर काँग्रेस आणि राष्टÑवादीत सहमती झाली आहे.
राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मुंबईत शरद पवार यांच्यासह दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी एकत्र चर्चा केली.
येऊ घातलेल्या महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसने सहभागी झाले पाहिजे, असा आग्रह राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धरला. राज्याला स्थिर सरकार द्यायचे असेल तर ते काँग्रेसच्या सहभागाशिवाय शक्य नसल्याचे
त्यांनी पटवून दिले. तसेच मंत्रिपदांचे वाटप, किमान समान कार्यक्रम यावर चर्चा झाली. त्यानंतर खा. पवार यांनी उद्धव ठाकरे यांना बैठकीतील निर्णयाची माहिती दिली.
शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत ११ नोव्हेंबर रोजी अधिकृत प्रस्ताव दोन्ही काँग्रसच्या नेत्यांना दिला.
मात्र एवढ्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्याआधी काही मुद्द्यांवर अधिक चर्चेची गरज आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी यांचे एकमत झाल्यानंतरच सरकार स्थापन करण्याबाबतचा सविस्तर निर्णय जाहीर केला जाईल, असे राष्टÑवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
>सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शिका व राज्यघटनेचा अनादर करून महाराष्टÑात राष्टÑपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपालांनी काँग्रेसला आमंत्रित न करणे हे चुकीचे आणि घटनाबाह्य आहे.
- अहमद पटेल, काँग्रेस नेता