Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा उद्या होणार शपथविधी; अधिवेशन बोलविण्याचे राज्यपालांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 06:05 PM2019-11-26T18:05:29+5:302019-11-26T18:06:43+5:30

राज्यात गेल्या काही तासांत घडलेल्या घडामोडीमुळे अनेक उलथापालथ पाहायला मिळाली.

Maharashtra Government: Newly elected MLAs to take oath tomorrow; Governor's order to first session of new assembly | Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा उद्या होणार शपथविधी; अधिवेशन बोलविण्याचे राज्यपालांचे आदेश 

Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा उद्या होणार शपथविधी; अधिवेशन बोलविण्याचे राज्यपालांचे आदेश 

Next

मुंबई - राज्यातील सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षात अखेर राज्यपालांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलविण्याचे आदेश विधिमंडळाला दिले आहेत. उद्या सकाळी ८ वाजल्यापासून विधानसभेचे अधिवेशन सुरु होईल. हंगामी अध्यक्ष म्हणून राज्यपालांना आमदार कालिदास कोळंबकर यांना शपथ दिली आहे. त्यामुळे कालिदास कोळंबकर हे नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्याचं काम करतील. त्यानंतर विधानसभेचा अध्यक्ष निवडला जाईल. 

राज्यात गेल्या काही तासांत घडलेल्या घडामोडीमुळे अनेक उलथापालथ पाहायला मिळाली. सकाळी सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्यानंतर उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीत कोण बाजी मारणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. दरम्यानच्या काळात अजित पवारांनी राजीनामा देऊन महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप घडवून आणला. 

अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा सरकार अल्पमतात गेलं. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अवघ्या साडेतीन दिवसात भाजपा सरकार कोसळलं. राज्यात गेल्या महिनाभरापासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटला तरी राज्यात कोणाचंही सरकार स्थापन झालं नाही. ८ नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाली. विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांना शपथ न घेतल्याने अधिकारही मिळाले नाही. सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाला मात देण्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीला यश आलं. 

विधानसभा बरखास्त झाल्यानंतर राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. मात्र बहुमताचा आकडा नसल्याने भाजपाने सत्तास्थापन केली नाही. मात्र अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचे पाठिंबा पत्र भाजपाला दिल्यानंतर रातोरात राज्यावरील राष्ट्रपती राजवट हटवून भाजपाने २३ नोव्हेंबर २०१९ ला सत्तास्थापन केली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. मात्र राज्यात बदलणाऱ्या घडामोडीनंतर अजित पवारांनी वैयक्तिक कारण सांगून उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपा सरकार अल्पमतात गेलं. अखेर २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने सरकार पडलं. महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे.    
 

Web Title: Maharashtra Government: Newly elected MLAs to take oath tomorrow; Governor's order to first session of new assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.