Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा; महाविकासआघाडीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 11:35 AM2019-11-26T11:35:15+5:302019-11-26T12:12:05+5:30
महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागले होते. महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आजच द्यावा असं सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायलयाने बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय दिल्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी बहुमत सिद्ध करु असा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी घडत होत्या. मात्र या घडामोडींवर कोणतीच प्रतिक्रिया न देणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील आज आम्ही बहुमत सिद्ध करु असं सांगितले आहे. त्याचप्रमाणे आम्ही बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार असल्याचे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
विश्वासदर्शक ठराव जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तसे युक्तिवाददेखील त्यांच्या वकिलांकडून करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. तर या निकालामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील हॉटेल हयातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शिवसेना-अपक्ष आमदारांच्या महाविकासआघाडीच्या 162 विधिमंडळ सदस्यांनी संविधानाला साक्षी मानून सोमवारी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करणार शपथ घेतली. रात्रीच्या अंधारात, अनैतिक मार्गाने स्थापन झालेल्या सरकारच्या विरोधात मत देण्याबाबत शपथ घेण्यात आली होती.