Maharashtra Government: शिवसेनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन प्रस्ताव तयार; उद्धव ठाकरे काय स्वीकारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 04:14 AM2019-11-22T04:14:18+5:302019-11-22T06:45:32+5:30

दोन्ही पक्षांचे नेते शिवसेना नेत्यांशी करणार चर्चा

Maharashtra Government: Shiv Sena CM fixed; Deputy Chief Minister of Congress, NCP | Maharashtra Government: शिवसेनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन प्रस्ताव तयार; उद्धव ठाकरे काय स्वीकारणार?

Maharashtra Government: शिवसेनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन प्रस्ताव तयार; उद्धव ठाकरे काय स्वीकारणार?

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेसह कशा प्रकारे सरकार स्थापन करावे, याबाबतचा फॉर्म्युला काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी तयार केला असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची शुक्रवारी मुंबईत शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा होणार असून, त्यानंतर सरकार स्थापनेची तिघांतर्फे अधिकृत घोषणा होईल, असे समजते. शरद पवार मुंबईत परतताच रात्री उशिरा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पवार यांच्याशी निवासस्थानी सविस्तर चर्चा केली. शिवसेनेच्या आमदारांचीही उद्या मुंबईत बैठक होणार असून, त्यासाठी आमदार येण्यास सुरुवात झाली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जो फॉर्म्युला तयार झाला आहे, त्यात दोन प्रस्ताव असून, ते शिवसेनेसमोर ठेवण्यात येणार आहेत. एका फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या वाट्याला प्रत्येकी उपमुख्यमंत्रिपदासह अनुक्रमे १५ व १३ मंत्रिपदे येतील. दुसऱ्या प्रस्तावात शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि तिन्ही पक्षांचे प्रत्येकी १४ मंत्री असा उल्लेख आहे.

तिन्ही पक्षांना समान मंत्रिपदाची मागणी शिवसेनेने मान्य न केल्यास महत्त्वाची खाती मिळावीत, असा या पक्षांचा आग्रह असेल. राष्ट्रवादीला गृह, अर्थ ही खाती हवी असून, महसूल व ग्रामीण विकास ही खाती आपल्याला मिळावीत, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. नगरविकास खाते शिवसेनेला देण्यास दोन्ही पक्षांची तयारी आहे. त्यामुळे समान मंत्रिपदे घ्यायची की काँग्रेस-राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती द्यायची, हा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे.

किमान समान कार्यक्रमात ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दाऐवजी कोणताही धार्मिक भेदभाव न करता राज्य सरकार साऱ्या योजना लागू करेल, असा उल्लेख असेल आणि समान कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. राज्य सरकारमधील रिक्त पदे ताबडतोब भरण्याचाही त्यात उल्लेख असू शकेल. याशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या जवळपास सर्वच आश्वासनांना किमान समान कार्यक्रमात अंतर्भूत केले जाईल.

काँग्रेसने विधिमंडळ पक्षनेता अद्याप निवडलेला नाही. त्यामुळे तो निवडीसाठी शुक्रवारी विधान भवनात बैठक होईल. काँग्रेसतर्फे मंत्रिपदासाठी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम यांना यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावे जवळपास निश्चित असल्याचे समजते.

दोन्ही पक्षांच्या गुरुवारी दुपारी झालेल्या बैठकीआधी सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रात शिवसेनेसह सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाची तसेच किमान समान कार्यक्रमाची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये प्रामुख्याने खातेवाटपाबाबत चर्चा झाली. त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली आणि महत्त्वाची खात्यांचे समान वाटप करण्यावर एकमत झाले. दोन्ही पक्षांचे नेते उद्या मुंबईत आधी त्यांच्या आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई (कवाडे), तसेच डावे पक्ष व शेकाप यांच्याशी चर्चा करणार आहेत. सर्वांमध्ये मतैक्य झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांशी ते चर्चा करतील आणि कदाचित त्यानंतर लगेचच पत्रकार परिषदेत आघाडी सरकार स्थापनेची घोषणा केली जाईल.

आठवडाभरात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन सरकार स्थापन केले जाईल, असा दावा शिवसेनेचे खा. संजय राऊ त यांनी केला. आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली असून लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले.

राज्यपालांचा दिल्ली दौरा रद्द
देशातील राज्यपालांच्या परिषदेसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी हे दिल्लीत जाणार होते. मात्र त्यांनी आजचा दौरा रद्द केला. उद्या ते दिल्लीत जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कदाचित उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकमत झाले तर या तीनही पक्षांचे नेते राज्यपालांना जाऊन भेटतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील. त्यामुळे राज्यपालांनी आजचा दौरा रद्द केल्याची चर्चा आहे.

Web Title: Maharashtra Government: Shiv Sena CM fixed; Deputy Chief Minister of Congress, NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.