Maharashtra Government : काँग्रेससोबत चर्चा योग्य दिशेने, लवकरच निर्णय - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 02:45 PM2019-11-13T14:45:46+5:302019-11-13T15:24:13+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : जवळपास 55 मिनिटे चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.
मुंबई : सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट कालपासूनच लागू झाली आहे. असे असले तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी चर्चा योग्य दिशेने सुरु आहे. निर्णय लवकरच कळेल, असे सांगितले.
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी चर्चा तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबत वांद्रे येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक झाली. जवळपास 55 मिनिटे चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर काँग्रेससोबत बैठक झाली, चर्चा योग्य दिशेने सुरु आहे, निर्णय लवकरच कळेल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली.
Uddhav Thackeray after meeting with Congress leaders: Discussions have started, whatever decision will be taken we will inform soon. #MaharashtraGovtFormationpic.twitter.com/YWkRm2ttPe
— ANI (@ANI) November 13, 2019
तत्पूर्वी, सत्तास्थापनेच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत शरद पवार, अजित पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र बैठक होऊन चर्चा होणार आहे. आमच्या दोन पक्षात एकवाक्यता झाल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी दिली आहे.
याचबरोबर, या बैठकीत समान कार्यक्रम ठरविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावे आहेत. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.