Maharashtra Government: निकालानंतर अमोल कोल्हे कुठं गायब? खासदार महोदयांनीच सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 09:40 AM2019-11-16T09:40:10+5:302019-11-16T09:40:20+5:30
Maharashtra Government: महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई - खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरुर मतदारसंघातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमानंतर अमोल कोल्हेंनी मतदारसंघातील जनतेला संबोधित केलं. अमोल कोल्हेंनी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे विचार गावागावात पोहोचवले. छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या साताऱ्यातही अमोल कोल्हेंनी सभा घेऊन राष्ट्रवादीला मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र, निवडणूक निकालानंतर अमोल कोल्हे गायब झाल्याचं दिसलं.
अमोल कोल्हे विजयी सेलिब्रेशनमध्ये कुठेही दिसेना झाले. अमोल कोल्हे निकालानंतर गायब झाले. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. तर, पत्रकारांनीही याबाबत माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. आता, खुद्द अमोल कोल्हेंनीच या प्रश्नाचं उत्तर दिलंय. अमोल कोल्हेंनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मी कुठं गायब झालो हे सांगितलं.
''आपल्याला एक कळतं की, आपला रोल संपला की आपण व्यासपीठ सोडायचं. स्टेजवर कधी थांबायचं आणि विंगेत कधी जायचं हे ज्याला कळतं त्यालाच रोल निभावता येतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे'', असे म्हणत अमोल कोल्हेंनी पक्षाने दिलेली जबाबदार आपण पार पाडली, त्यानंतर आपलं काम संपलं, असं सांगितलं. त्यासोबतच महाशिवआघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबतही कोल्हेंनी भूमिका विशद केली.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादीत गेलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना महाशिवआघाडी बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना महाशिवआघाडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर याबाबत चर्चा करू असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. अमोल कोल्हे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार येणार की दुसरं कोणाचं सरकार येणार याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारचं उत्तर देऊ शकतात असं कोल्हेंनी स्पष्ट केलं होतं. तर, आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलतानाही त्यांनी पवारांवरील विश्वास कायम ठेवण्याचं म्हटलं.
महाराष्ट्राला हा विश्वास आहे, जी भूमिका शरद पवार घेतील, ती महाराष्ट्राच्या भल्याची, महाराष्ट्राच्या कल्याणाची असेल. आपण हा विश्वास साहेबांसाठी कायम ठेऊया. माझं जनसंपर्क कार्यालय तुमचं आहे, तुमच्यासाठीच आहे, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी आपल्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यातील महाशिवआघाडी संदर्भात अप्रत्यक्षपणे विधान केले.