पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेतले? CM देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 20:14 IST2024-12-05T20:12:07+5:302024-12-05T20:14:07+5:30
Maharashtra CM Swearing-in Ceremony: लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना तसेच अन्य सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेतले? CM देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra CM Swearing-in Ceremony: मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एनडीएतील राज्यांचे मुख्यमंत्री, दिग्गज उद्योगपती, अभिनेते-कलाकार, क्रिकेट विश्वातील मंडळी, संत-महंत तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
आझाद मैदानावरील भव्य-दिव्य शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय गाठले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. या तिघांनी मंत्रालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना तसेच संविधान उद्देशिकेला अभिवादन केले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाल्याची महिती देण्यात आली आहे. या बैठकीत काय झाले? कोणते निर्णय घेतल? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेतले?
गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवले. अतिशय गतिशील ते सरकार होते. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राने विकासाची गती घेतली. या गतीला आम्ही तसेच पुढे नेऊ. आता महाराष्ट्र थांबणार नाही. त्याच गतीने महाराष्ट्र प्रगतीकडे जाईल. पायाभूत क्षेत्र असो, सामाजित क्षेत्र असो, उद्योगाचे क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहील, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आमची पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली, त्यात आम्ही तिघांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, योग्य पद्धतीने धोरणात्मक निर्णय करून भविष्याची पायाभरणी करत राज्याला पुढे न्यायचे आहे. वेगवेगळ्या योजना, पायाभूत सुविधा, नदीजोड प्रकल्प असतील, सौरउर्जेचे प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, लाडकी बहीण योजना असेल, मुलींच्या शिक्षणासंदर्भातील निर्णय असतील, ते पुढे सुरूच ठेवायचे आहेत. आमचा प्रयत्न असणार आहे की, आम्ही आमच्या वचननाम्यात जी आश्वासने दिली आहेत, ती आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्हाला पावले उचलायची आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आगामी काळात आम्हा तिघांमध्ये तोच समन्वय असल्याचे दिसून येईल. योग्य वेळी आम्ही योग्य निर्णय करू आणि आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की, एक लोकाभिमुख सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे सरकार हे महाराष्ट्राला पुढच्या काळात पाहायला मिळेल. अनेक अडचणी येतात, पण अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू. महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला आश्वासित करतो की, हे सरकार पारदर्शीपणे आणि गतिशीलतेने त्यांच्या कल्याणाकरिता काम करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.