अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे 'हे' आमदार बसले विरोधी बाकावर; यादी आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:04 PM2023-07-17T13:04:53+5:302023-07-17T13:06:02+5:30
Maharashtra Monsoon Session : अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार विरोधी बाकावर बसणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
मुंबई- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. दरम्यान, आजपासून अधिवेशनात सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट कोणत्या बाजूच्या बाकावर बसणार या चर्चा सुरू होत्या. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते विरोधी बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Monsoon Session)
Maharashtra Monsoon Session LIVE: अधिवेशनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे आठ आमदार आज उपस्थित होते. यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, रोहित पवार, राजेश टोपे, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे हे आमदार आज उपस्थित होते. शरद पवार गटाचे हे आमदार विरोधी बाकावर बसले होते.
२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. खासदार शरद पवार यांचे एक गट तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक गट असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांना मोठ्या संख्येने आमदारांचा पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी खासदार शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.
अधिवेशनात राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या गटातील कोणते नेते कोणत्या बाकावर बसणार या चर्चा सुरू होत्या. आज पहिल्याच दिवशी शरद पवार यांच्या गटातील आमदार विरोधी बाकावर बसले. यामुळे आता विधिमंडळात शरद पवार यांचा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात असल्याचे दिसतंय. (Maharashtra Monsoon Session)