‘उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं…’; राज ठाकरेंचं सूचक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 03:52 PM2023-07-02T15:52:39+5:302023-07-02T15:53:51+5:30
Maharashtra Political Crisis : आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबई- राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह ८ राष्टावादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळातून उलट-सुलट प्रतिक्रीया येत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्विट करुन खासदार शरद पवार यांना टोला लगावला आहे.
'आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच , असं सूचक ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे. (Maharashtra Political Crisis)
'तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं'.
शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा? प्रफुल्ल पटेल, झिरवळ, प्रतोद सगळेच अजित पवारांसोबत
'बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?, असंही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
— Raj Thackeray (@RajThackeray) July 2, 2023
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही…
शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा?
अजित पवार यांनी आज शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आला आणि मी तो स्वीकारला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या शपथविधीला नुकतीच पक्षाची मोठी जबाबदारी मिळालेले आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटलेही उपस्थित होते.