...तर ७७ टक्के लोकांचा शिंदे-फडणवीस सरकारला विरोध; अजित पवारांनी थेट गणितच मांडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 04:40 PM2023-06-14T16:40:11+5:302023-06-14T16:43:13+5:30
शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
मुंबई- काल राज्यातील वर्तमानपत्रात शिवसेनेतील शिंदे गटाने जाहिराती दिल्या. या जाहिरातीत एका सर्वेचा हावाला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच राज्यातील जनतेची पसंती असल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही पसंतीची आकडेवारी देण्यात आली होती. यात देवेंद्र फडणवीस यांना २३ टक्के तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २६ टक्के अशी आकडेवारी दिली होती, या आकडेवारीवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या आकडेवारीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, काल आलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २६ टक्के तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २३ टक्के असं दिलंय. दोन्ही टक्के एकत्र केले तर इतर ५१ टक्के लोकांनाही दुसरे मुख्यमंत्री हवे आहे. वेगवेगळे केले तर ७७ टक्के आणि ७४ टक्के लोकांनी इतरांना पसंती दिली, असा दावा अजित पवार यांनी केला.
'आज दिलेल्या जाहिरातील खाली फोटो असलेल्या मंत्र्यावर आरोप झाले आहे. या मंत्र्यावर पांघरुन घालण्यासाठी या जाहिराती दिल्या आहेत का?, असा सवालही पवार यांनी केला. आता ही जाहिरात एका हितचिंतकाने दिली असं एका मंत्र्याने सांगितलं आहे, पहिल्या पानावर जाहिरात देणाऱ्या हितचिंतकाचे नाव त्यांनी सांगाव. एवढा पैसा कसा काय आला. जनतेच्या मनात नक्की काय आहे हे निवडणुका घेतल्यानंतरच समजेल. तुम्हाला जर एवढा आत्मविश्वास असेल तर निवडणुकीला सामोरे जा, असंही अजित पवार म्हणाले.
“जाहिरात देणारा हितचिंतक कोण? भाजप मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत? किती खर्च...”: अजित पवार
' महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या. दूध का दूध पाणी का पाणी होईल. एवढ्या मोठ्या जाहिरातीचा खर्च कोणी केला हे जनतेला समजले पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.