Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 06:50 PM2024-06-14T18:50:24+5:302024-06-14T18:53:08+5:30
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात हव्या तेवढ्या जागा जिंकता आल्या नाहीत, भाजपाच्याही मोठ्या प्रमाणात जागा कमी झाल्या. यावरुन आरएसएसच्या मुखपत्रातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर खापर फोडले आहे.
Maharashtra Politics ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात हव्या तेवढ्या जागा जिंकता आल्या नाहीत, भाजपाच्याही मोठ्या प्रमाणात जागा कमी झाल्या. यावरुन आरएसएसच्या मुखपत्रातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर खापर फोडले आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यातील क्लोजर रिपोर्टला आता समाजसेवक अण्णा हजारे यांनी आव्हान दिले आहे. दरम्यान, आता यावरुन 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांबाबत भाष्य केले आहे.
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपेक्षीत जागा मिळाल्या नाहीत, भाजपाच्याही जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. यावरुन आता आरएसएसच्या मुखपत्रातून पराभवाच खापर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर फोडण्यात आले आहे. मुख्यपत्रातील एक लेखात अजित पवार यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे भाजपाला तोटा झाल्याचे म्हटले आहे. या युतीमुळे भाजपाच्या जागा कमी झाल्याचे म्हटले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. "गेली चार दिवस झाले अजित पवार यांना सगळीकडून घेरलं जात आहे. जणू काय महाराष्ट्राच्या पराभवाला अजितदादाच जबाबदार आहेत. यांच्यातील एक माणूस बोलत नाही, आपल्या नेत्याबद्दल प्रेम, आदर असायला पाहिजे. समोरचा कितीही तगडा असो समोरच्यांनी केलेला वार पहिला मला असेल नंतर नेत्यावर अशी मानसिकता ठेवावी लागते, त्यालाच निष्ठा म्हणतात. निष्ठा बाजूला बसून चहा पिणे नव्हे किंवा खुर्चीला खुर्ची लावून बसणे नाही, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
"निष्ठा म्हणजे माझ्या नेत्याच्याविरोधात कोणीही बोललं तरीही मी विरोध करणार. आता सध्या कोणच तसं करत असल्याचं दिसत नाही, याची मला खंत वाटतं आहे. मी एक साधा प्रश्न विचारतो, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पराभवाला कोण जबाबदार? बंगालमध्ये जागा कमी झाल्या त्याला कोण जबाबदार?, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला. भले माझे आणि त्यांचे वैचारिक मतभेद आहेत. पण, कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला सोडता कामा नये. हीच वेळ असते आपल्या नेत्यासोबत आहे हे दाखवायची, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. फक्त दादांकडे निधी, फायदे, फोन यासाठी दादा नाहीत. अजितदादांसाठी हे पण करायला पाहिजे, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
अण्णा हजारे क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कोणतेही पुरावे नाहीत, असे सांगून मुंबई पोलिसांनी जानेवारीमध्ये न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. दरम्यान आता त्याच प्रकरणातील क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे.याच क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार आहेत. यामुळे आता अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.