मोठी बातमी! कोणाचीही माघार नाही, विधान परिषदेची निवडणूक अटळ, कुणाला धक्का बसणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 03:20 PM2024-07-05T15:20:53+5:302024-07-05T15:30:13+5:30
Vidhan Parishad Election : विधान परिषदेतील ११ जागांसाठी १२ अर्ज दाखल झाले आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती.
Vidhan Parishad Election( Marathi News ) : महाराष्ट्र विधान परिषदेत ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवारांचे अर्ज आले आहेत, आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. ३ वाजेपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे आता विधान परिषदेची निवडणूक आता होणार आहे.
जागा ११, उमेदवार १२; अर्ज माघारीसाठी राहिले फक्त दोन तास; नार्वेकरांसाठी शिंदे की पवार गट रसद देणार?
अर्ज माघारी घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. दरम्यान, आता या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी या दोन्ही गटांना मते फुटण्याची भीती आहे. मिलिंद नार्वेकर यांचे शिवसेनेच्या आमदारांशीच नाहीत तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे १७ ते १८ आमदार फुटण्याच्या वाटेवर आहेत. शरद पवारांच्या आश्रयाला जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे भाजपाचा स्वत:च्या आमदारांवर जरी विश्वास असला तरी शिंदे आणि पवार गटाच्या आमदारांनी दगाफटका केला तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे.
विधान परिषद निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याची वेळ आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. यामुळे महायुती एक पाऊल मागे घेणार की मविआ याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, पण कोणीही अर्ज मागे घेतलेला नाही. नार्वेकरांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक अटळ झाली आहे.
महायुतीकडे किती संख्याबळ?
विधानसभेत सध्या भाजपचे १०३, शिंदेसेनेचे ३९, अजित पवार गटाचे ४० आमदार आहेत. याशिवाय या तिन्ही पक्षांना काही अपक्ष व छोट्या पक्षांचा पाठिंबा आहे. महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यासाठी त्यांना ११५ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. म्हणजेच १२ मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे ९ आमदार भाजपसोबत आहेत. शिल्लक तीन मतांची तजवीज करणे त्यांच्यासाठी कठीण नाही.
शिंदेसेनेने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी त्यांना सात अतिरिक्त मते लागतील.
अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनाही सहा मतांची तजवीज करावी लागणार आहे. शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांना १० अपक्षांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे दोन आमदारही सध्या अजित पवार यांच्या गोटात आहेत.