Vidhan Sabha 2019: मुंबईत रंगणार अस्मिता, भाषा आणि विकासाचा मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 01:08 AM2019-09-22T01:08:48+5:302019-09-22T01:09:18+5:30
युतीच्या घोषणेकडे सगळ्यांचे लक्ष; मनसेचा अस्तिवासाठी लढा, आघाडीनेही कसली कंबर
मुंबई : यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या पारड्यात पूर्ण दान टाकणाऱ्या मुंबईकरांनी २०१४लाही साधारणपणे असाच कौल दिला होता. त्यावेळी ऐन मोसमात युती तुटली आणि दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. तरीही मुंबईकरांनी २९ जागा या दोन्ही पक्षाच्या पारड्यात टाकल्या होत्या. यावर्षी अजूनतरी युती होईलच असे सांगितले जात आहे. तसे झाले तर एकूण रागरंग लक्षात घेता युती बाजी मारेल अशी परिस्थिती आहे. आघाडीनेही कंबर कसली असली तरी त्यांना खूपच मेहनत करावी लागणार आहे. तर मनसेसाठी हा अस्तित्वाचा लढा ठरणार आहे.
शनिवारी नवी दिल्ली येथे राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यात राज्यात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होईल, तर २४ आॅक्टोबर रोजी निकाल लागून २७ आॅक्टोबरपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले.
शिवसेना-भाजप यांच्यातील युतीचे रोज नवनवीन फॉर्म्यूले समोर येत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील इच्छूकांना आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी अजूनही आशा आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. तर दुसरीकडे आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्र्वादी कॉंग्रेस यांना उमेदवारांची चणचण भासते आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या वाट्याला चार जागा येतील. तर कॉंग्रेस मित्रपक्षांसह ३२ जागा लढवेल, अशी माहिती आहे.
मोठे नेते मैदानात
लोकसभेला ज्यांना यश मिळू शकले नाही अशा उमेदवारांसह पक्षाचे मोठे नेतेही विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरावेत, अशी अपेक्षा कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केली आहे. त्यानुसार, मुंबईत मिलिंद देवरा, संजय निरुपम, एकनाथ गायकवाड आदी नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात विरोधकांचा सामना करावा, अशी पक्षात चर्चा आहे.
वंचितचा जोर किती
लोकसभा निवडणुकीत मुंबईत फारसा जोर दाखवू न शकलेल्या वंचित आघाडीच्या कामगिरीकडेही सगळ््यांचे लक्ष लागलेले आहे. शिवाय, एक जागा पटकावणाºया एमआयएम आणि समाजवादी पक्ष यांना त्यांच्या जागा कायम राखता येतात का, याबद्दल आता मतमतांतरे आहेत.
शहरात काय होणार-: कुलाबा ते शीव आणि माहिमपर्यंतचा परिसर मुंबई शहर जिल्ह्यात येतो. आकारमान किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्ह म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. मात्र या छोट्या जिल्हतील विधानसभा मतदारसंघाची संख्या आहे दहा. यापैकी सध्या भाजप, शिवसेना आणि काँग्रेसकडे प्रत्येकी तीन जागा आहेत. तर, एका जागेवर एमआयएमचा आमदार आहे. पाच वर्षात राजकीय आघाडीवर बºयाच उलथापालथी झाल्या. युती आणि आघाडीतील या संभाव्य लढतीत निवडक जागांवर मनसे आणि एमआयएममुळे तिरंगी किंवा चौरंगी लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
उपनगरात हवा कोणाची : मुंबई उपनगर जिल्ह्यात सायनपासून मुलुंड आणि माहिमपासून पार दहिसरपर्यंतचा परिसर येतो. २०१४ पर्यंत युतीच्या जागावाटपात शिवसेनाच थोेरल्या भावाच्या भूमिकेत असायचा. २६ पैकी तब्बल १६ जागा शिवसेनेकडे तर उर्वरित दहा जागा भाजपच्या वाट्याला यायच्या. २०१४ च्या निवडणुकांनी मात्र मुंबईतील राजकीय समीकरणे बदलून टाकली. युतीतील एकीचा सारा कस लागणार आहे तो मुंबई उपनगर जिल्ह्यात. तब्बल २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणाºया या जिल्ह्यातील जागावाटपाचे गणित युतीचे नेते कशाप्रकारे सोडवितात, यावर बरेच काही अवलंबून आहे.
आघाडीला उमेदवारांचा शोध
मुंबईच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्ती अतिशय क्षीण झालेली आहे. या पक्षाने कधीही मुंबईतील पक्ष बांधणीचा नेमका विचार केला असे कधी दिसले नाही. एक-दोन मोठ्या नेत्यांचा व्यक्तिगत करिष्मा त्या त्या भागात पक्षाला यश देत होता. यंदा त्याचाही अभाव आहे. तर कॉंग्रेसची अवस्था गटातटाच्या राजकारणामुळे बिकट झालेली आहे. वारंवार पराभवाचे तडाखे बसूनही या पक्षाचे स्थानिक नेते एकत्र येऊन लढायला तयार नाहीत. त्यामुळे पक्षाला या निवडणुकीत आव्हान देऊ शकेल, अशा तगड्या उमेदवारांचा शोध लागायचा आहे. तिकिटासाठी झालेल्या मुलाखतीत अनेकांची नावे पुढे आली असली तरी निवडून येण्याची क्षमता खरेच कोणात आहे, हे पाहून उमेदवारी देणे हे मोठे आव्हानच असणार आहे.
इतिहास युतीच्या बाजूचा
शहर आणि उपनगरात एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१४च्या निवडणुकीत भाजपला १५, शिवसेनेला १४, कॉंग्रेसला ५ आणि समाजवादी पक्ष व एमआयएम यांना प्रत्येकी १ जागा मिळाली होती. २०१९च्या एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी ३ जागा मिळाल्या.
आदित्य निवडणूक लढवणार का?
जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून ज्यांचे नेतेपद ठसवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला ते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ही विधानसभेची निवडणूक लढवणार का, हा या वेळचा मोठा औत्स्युक्याचा विषय आहे. त्यांनी वरळी किंवा इतर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवली तर ठाकरे घराण्यातील ती पहिलीच प्रत्यक्ष निवडणूक असेल.
मनसेमध्ये संभ्रम
मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्वच बैठकांमध्ये निवडणूक लढवण्याच्या बाजूने कौल दिला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या मनसेच्या तथाकथित प्रभाव पट्ट्यात तरी पक्षाने उमेदवार उभे करावेत, अशी भूमिका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मांडली आहे. आता पक्ष प्रमुख राज ठाकरे त्यावर काय निकाल देतात, याकडे सगळ््यांचे लक्ष लागलेले आहे.
यांनी केली हॅटट्रीक
सरदार तारासिंग १९९९, २००४, २००९, २०१४
मंगल प्रभात लोढा १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४
वर्षा गायकवाड २००४, २००९, २०१४
कमी फरकाने झाला विजय
कालिदास कोळंबकर, कॉंग्रेस - ८००
तुकाराम काते, शिवसेना - १००७
संजय पोतनीस, शिवसेना - १२९७
सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप- १५
शिवसेना-१४
काँग्रेस- ०५
सपा-०१
एमआयएम-०१