Vidhan Sabha 2019: कसं काय...बरं हाय ना! भाजपाचा 'रम्या' देणार विरोधकांना प्रेमाचे डोस; कोण आहे तो?
By प्रविण मरगळे | Published: September 21, 2019 07:59 AM2019-09-21T07:59:24+5:302019-09-21T08:04:54+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - ग्रामीण भागातील शैली असलेला हा रम्या गेलेल्या आघाडी सरकारच्या आठवणी जागवायला येणार आहे.
प्रविण मरगळे
मुंबई - विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्याची एकही संधी सोडताना पाहायला मिळत नाही. सध्याच्या घडीला सोशल मीडिया हे हत्यार प्रखरतेने राजकीय पक्षांच्या प्रचारात दिसतं. त्याचाच भाग म्हणून सत्ताधारी भाजपाने रमेश उर्फ रम्या या सामान्य माणसाच्या माध्यमातून विरोधकांना प्रेमाचे डोस पाजण्यासाठी आणलं आहे.
आता तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल हा रम्या कोण आहे? तर आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाकडून ही अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे. एका काल्पनिक पात्रातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चिमटे अन् टोमणे मारण्यासाठी निवडणुकीच्या कालावधीत हा अवतरणार आहे. एखाद्या काल्पनिक नाट्याप्रमाणे भाजपाने विरोधकांवर टीका करण्याचं हे हत्यार आणलं आहे.
नमस्कार मंडळी,
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 20, 2019
तुम्हा-आम्हापैकी एक असलेला रमेश उर्फ 'रम्या' पुढील काही दिवस आघाडी सरकार व त्यांच्या मित्र पक्षांवर असलेल्या प्रेमाची उजळणी करणार आहे. आपल्या प्रेमाचे डोस पाजण्यासाठी '#रम्याचेडोस' च्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे.
नक्की वाचा!@NCPspeaks@INCMaharashtrapic.twitter.com/oZy8rfxcaK
हा रमेश म्हणजे उर्फ रम्या, महाराष्ट्रातल्या भानामती-बुद्रुक गावचा राहणारा, भाजपा सरकारनं केलेल्या कामाचा पाढा वाचताना यापूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कामांवर टीका आणि घोटाळ्याची आठवण करुन देण्यासाठी खास निवडणुकीच्या प्रचारात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकार आणि त्यांचे मित्र पक्ष यांच्यावर टीका करण्यासाठी आठवणींची उजळणी करण्यासाठी त्याला आणलं गेलं आहे.
ग्रामीण भागातील शैली असलेला हा रम्या गेलेल्या आघाडी सरकारच्या आठवणी जागवायला येणार आहे. भाजपा महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटरवरुन त्याची ओळख करुन देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत सत्ताधारी भाजपा रम्याचा वापर करुन विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नेमका रम्या प्रचारात किती रंगत आणतो ते आगामी काळात दिसून येईल.
लोकसभा निवडणुकीपूर्वी उमेदवार नसतानाही प्रचारात आघाडी घेतलेल्या मनसेने लाव रे तो व्हिडीओ यामाध्यमातून रंगत आणली होती. भाजपाच्या जाहिरातींची पोलखोल करणारे व्हिडीओमुळे निवडणूक न लढताही मनसे चर्चेत राहिली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी हेदेखील सोशल मीडियावर सक्रिय आहे. युवक काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन एक दिवसाचा मुख्यमंत्री अशी अनोखी संकल्पना मांडण्यात आली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सोशल मीडियाचा वापर करुन एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे.