Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या सहा आमदारांना भाजपशी सलगी भोवण्याची चिन्हे ,पहिल्या यादीतून पत्ता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:13 AM2019-09-29T06:13:43+5:302019-09-29T06:13:56+5:30
भाजपच्या मेगाभरतीत आपलाही नंबर लागेल, या आशेने कुंपणावर बसून असलेल्या सहा काँग्रेस आमदारांना भाजपशी सलगी भोवण्याची चिन्हे आहेत.
मुंबई : भाजपच्या मेगाभरतीत आपलाही नंबर लागेल, या आशेने कुंपणावर बसून असलेल्या सहा काँग्रेस आमदारांना भाजपशी सलगी भोवण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसची पहिली यादी तयार असून, त्यात या सहा संभाव्य बंडखोर आमदारांचा पत्ता कट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस, राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणावर आजी, माजी आमदारांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये उडी घेतली. भाजपनेही मेगाभरतीचा इव्हेंट करण्याची संधी साधली. आघाडीतील दोन डझनहून अधिक नेत्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच युतीच्या गोटात प्रवेश केला, तर अद्याप किमान अर्धा डझन आमदार युतीशी बोलणी करण्यात गुंतले आहेत. समर्थक कार्यकर्त्यांचे मेळावे घेत, नाराजीचा सूर आळवणाऱ्या या नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमांकडे मात्र पाठ फिरवली. यातील काही जणांनी तर उमेदवारांच्या मुलाखतीला दांडी मारली. मात्र, शिवसेना, भाजपच्या जागा वाटपातील न सुटलेला तिढा आणि युतीच्या स्थानिक नेत्यांनी केलेला तीव्र विरोध, यामुळे पक्षांतरासाठी आसुसलेल्या या नेत्यांसाठी युतीचे दरवाजे मात्र बंदच आहेत.
काँग्र्रेसनेही या आमदारांना तंगविण्याची तयारी चालविली आहे. उमेदवारांच्या पहिल्या यादीतून या संभाव्य बंडखोर उमेदवारांची नावे वगळण्यात आल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. या नेत्यांचा भाजप प्रवेश झाला नाही तरी त्याची दखल घ्यायची नाही, असे धोरण स्वीकारत बंडखोर नेत्यांची नावे पहिल्या यादीतून वगळण्यात आली आहेत. यात मुंबईतील मालाड पश्चिमचे काँग्रेस आमदार अस्लम शेख, भारत भालके (पंढरपूर, जिल्हा सोलापूर), बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे, सोलापूर जिल्ह्यातून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील आमदार सिद्धाराम म्हेत्रे, धुळे जिल्ह्यातील साक्रीचे आमदार धनाजी अहिरे आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांची नावे पहिल्या यादीतून गायब होण्याची शक्यता आहे.
पृथ्वीराज चव्हाण लोकसभेच्या आखाड्यात
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कराड दक्षिणमधून उमेदवारी नक्की करण्यात आली होती. मात्र, सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागल्याने
पृथ्वीराज चव्हाण यांना येथून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उतरविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.