मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 08:26 PM2024-11-20T20:26:01+5:302024-11-20T20:27:33+5:30

मुंबईत भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे.

Maharastra Assembly Election 2024 Mumbai Region Exit Poll tough fight between MVA &Mahayuti | मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा

मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा

Mumbai Region Exit Poll Results : विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडलं आहे. मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे येण्यास सुरुवात झाली आहे. विविध एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त सर्व पक्षांमध्ये भाजप मोठा पक्ष असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर मुंबईत भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता एक्झिट पोल सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या एकूण ३६ मतदारसंघ असून त्यातील १० मतदारसंघ हे मुंबई शहरात आणि उर्वरित २६ मतदारसंघ हे मुंबई उपनगरात येतात. पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई शहरात ४९.०७ टक्के तर मुंबई उपनगरात ५१.७६ टक्के मतदान झालं आहे. सर्वाधिक मतदान हे भांडूप विधानसभा मतदारसंघात झालं आहे. दुसरीकडे विविध एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे.

एसएएस ग्रुपच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला मुंबईत १८-१९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीला १७-१८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतरांना मुंबईत १-२ जागा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकशाही रुद्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुंबईत भाजपला १२, शिवसेना (शिंदे गट) दोन, राष्ट्रवादी (अजित पवार गट)एक, काँग्रेसला दोन 
शिवसेना (ठाकरे गट ) १४, राष्ट्रवादी (शरद पवार गट)एक आणि इतरांना चार जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Zeenia AI एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुतीला १५-२०, महाविकास आघाडीला १५-२० आणि इतरांना एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे २२, काँग्रेसचे ११ आणि शरद पवार गटाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर एका जागेवर समाजवादी पार्टीने उमेदवार दिला आहे. तर महायुतीमध्ये भाजप १८, शिंदे गट १६ आणि अजित पवार गटाने दोन जागांवर निवडणूक लढवली आहे. यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईत २५ उमेदवार रिंगणात उभे होते.

Web Title: Maharastra Assembly Election 2024 Mumbai Region Exit Poll tough fight between MVA &Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.