औषधे, यंत्रसामुग्रीचा पुरवठा सुरळीत ठेवा; विधानसभा अध्यक्षांचा जे. जे. रुग्णालयाचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 07:48 AM2023-10-26T07:48:35+5:302023-10-26T07:49:26+5:30
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अचानकपणे सेंट जॉर्जेस रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांना आरोग्य व्यवस्थेत काही त्रुटी आढळून आल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अचानकपणे सेंट जॉर्जेस रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांना आरोग्य व्यवस्थेत काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि जे. जे. समूह रुग्णालयातील संबंधित अधिकारी आणि डॉक्टर यांची बैठक बोलवली होती. त्यामध्ये त्यांनी सर्व रक्ताच्या चाचण्या रुग्णालयातच करा, औषध व यंत्रसामुग्रीचा पुरवठा सुरळीत ठेवा तसेच रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जे. जे. समूह रुग्णालयाच्या अखत्यारीत जीटी, सेंट जॉर्जेस आणि कामा रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णालयांतील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आयुक्त राजीव निवतकर, जे. जे. च्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जीटी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भालचंद्र चिखलकर, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर, कामाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे व हाफकीनच्या खरेदी कक्षाचे अधिकारी उपस्थित होते.
दीड तासापेक्षा अधिक चर्चा
वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दीड तासापेक्षा अधिक चाललेल्या चर्चेत चतुर्थ श्रेणी कामगार भरती, रुग्णालयातील औषध आणि यंत्रसामुग्री खरेदी करून त्याचा पुरवठा सुरळीतपणे रुग्णालयांना करणे, रक्ताच्या चाचण्या बाहेर न पाठवता रुग्णालयातच करणे, जे. जे. रुग्णालयातील हृदयविकाराच्या तक्रारी दूर करण्यासाठी महत्त्वाची असणारी कॅथलॅब, रुग्णालयातील स्वच्छता या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व गोष्टींची दखल घेऊन सर्व गोष्टींची कार्यवाही करण्यात येईल, असे या बैठकीत सांगितले.