अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करा, काँग्रेस नेते पटोलेंवर नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:37 AM2022-09-20T06:37:55+5:302022-09-20T06:38:34+5:30
नाराजी दूर करा म्हणणारे नेते पटोलेंवर नाराज
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्यासमोर काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचत त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना दिले असले, तरी प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्याची मागणीही या नेत्यांनी केल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी एच. के. पाटील, पल्लम राजू यांची भेट घेऊन पटोलेंविरोधात तक्रार करताना अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे.
पटोले यांचे संघटनावाढीकडे दुर्लक्ष झाले असून, ते कुणालाही विश्वासात न घेता कुणाच्याही नियुक्त्या करतात, अशा तक्रारी या नेत्यांनी केल्याचे समजते.
अशोक चव्हाण यांचा पक्षाने सन्मान केला पाहिजे. त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले तर महाराष्ट्रात पक्षाच्या जागा वाढतील, पक्ष मजबूत होईल, असा आशावाद या नेत्यांनी व्यक्त केल्याचेही समजते.
काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनाच नियुक्त करण्याचा ठराव नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीत एकमताने करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठरावही यावेळी संमत झाला.
ठरावाला पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुमाेदन दिले नाही.