“राहुल गांधी-कल्याण बॅनर्जींवर कायदेशीर कारवाई करा”; भाजपकडून मुंबई पोलिसांत तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 03:53 PM2023-12-21T15:53:20+5:302023-12-21T15:53:55+5:30
Mangal Prabhat Lodha News: उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
Mangal Prabhat Lodha News ( Marathi News ): संसद सुरक्षेतील त्रुटी आणि लोकसभेतील घुसखोरी यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात यासंदर्भात निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या मागणीवरून संसदेत झालेल्या गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील १४३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात विरोधकांनी संसद परिसरात निदर्शने केली. यात खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली. यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
खासदार निलंबन कारवाईविरोधात संसद परिसरात विरोधकांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मिमिक्री केली. कल्याण बॅनर्जी नक्कल करत असतानाचा व्हिडिओ काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी चित्रित केला. यावरून भाजपने उपराष्ट्रपतींची बाजू घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. यातच आता महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील काळाचौकी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, मिमिक्रीच्या वादावर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
मंगलप्रभात लोढा यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले पत्र
मंगल प्रभात लोढा यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एक पत्र दिले आहे. जनसामान्यांच्या भावना दुखावल्याबद्दल तक्रार नोंद करण्याबाबतचे हे पत्र देण्यात आले आहे. यामध्ये, लोकशाही मंदिर असणान्या संसद भवन परिसरात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताच्या सन्मानीय राष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केले आणि त्या प्रसंगांचे राहुल गांधी (खासदार) यांनी चित्रण केले. या प्रसंगाची तक्रार नोंद घेऊन खासदार कल्याण बॅनर्जी व खासदार राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, असे मंगल प्रभात लोढा यांनी या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याशी फोनवर चर्चा केली असून, या कृत्यावर दुःख व्यक्त केले. स्वतः धनखड यांनी ही माहिती दिली आहे.