मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून विधानसभेत काँग्रेस आक्रमक, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 03:48 PM2023-07-21T15:48:10+5:302023-07-21T15:49:59+5:30
Congress Against Manipur Violence : मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर (Manipur Violence) केंद्र व मणिपूरमधील भाजपा सरकारचा धिक्कार करत विधानसभेच्या पायऱ्यांवर सकाळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी आंदोलन केले
मुंबई - मणिपूरमध्ये महिला अत्याचाराच्या अत्यंत घृणास्पद घटना उघड झाल्या असून या घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या घटनांकडे बघ्याची भूमिका घेतली असून अशा निष्क्रिय केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाचा ठराव सभागृहात मांडला जावा आणि मणिपूर घटनेवर चर्चा घडून आणली जावी, अशी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे चर्चा मागितली होती. विधानसभा अध्यक्षांनी चर्चा नाकारल्याने काँग्रेसह विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
“मणिपूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून देशभरातून या घटनेचा धिक्कार करण्यात येत आहे. या घटनेवर विधानसभेत ठराव करुन पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे व सरकारचा धिक्कार झाला पाहिजे अशी विरोधकांची मागणी होती. काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी चर्चा घेण्याची मागणी लावून धरली परंतु विधानसभा अध्यक्षांनी बोलण्याची संधी दिली नाही. अध्यक्षांनी म्हणणेच ऐकून घेतले नाही त्यामुळे सरकारचा निषेध करुन सभात्याग केला”, अशी माहिती माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर केंद्र व मणिपूरमधील भाजपा सरकारचा धिक्कार करत विधानसभेच्या पायऱ्यांवर सकाळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी आंदोलन केले. यावेळी भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला व केंद्र व मणिपूर सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. मणिपूरच्या घटनेचा निषेध करत मणिपूरचे अमानवी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा ठराव काँग्रेस विधिमंडळ पक्षाने केला.