Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, मान्यवरांकडून समाजाला 'महत्त्वाचे आवाहन'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 05:06 PM2018-08-02T17:06:00+5:302018-08-02T17:07:39+5:30
Maratha Reservation: सरकारने आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा समाजातील नामवंत व्यक्तींचा समावेश होता. या बैठकीनंतर मराठा समजातील मान्यवरांनी, सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले.
मुंबई - सरकारने आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा समाजातील नामवंत लेखक, कलाकार आणि विचारवंतांचा समावेश होता. या बैठकीनंतर मराठा समजातील मान्यवरांनी, सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले. तसेच मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. तर महाराष्ट्रात कुठेही हिंसाचार होऊ नये आणि मराठा समाजातील बांधवांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असेही आवाहन या मान्यवरांनी केले आहे.
मराठा समाजाच्या मागण्या न्याय व वास्तव असून त्यासाठीच मोठ्या संख्येने मोर्चे निघाले व अद्यापही आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला कायदेशीर कसोटीवर टिकणारे आरक्षण लवकरात लवकर मिळवून द्यावे, त्याकरिता सरकारने तात्काळ पाऊले उचलावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत करण्यात आले आहे. या बैठकीला ज्येष्ठ साहित्यीक डॉ.अ.ह.साळुंके, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, सयाजी शिंदे, नितीन सरदेसाई, पोपटराव पवार, अॅड.हर्षद निंबाळकर, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड यांसह सरकारमधील महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे उपस्थित होते.