मतदानात मराठी मते ठरणार निर्णायक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 02:41 AM2019-04-27T02:41:08+5:302019-04-27T02:42:05+5:30
गोरेगाव, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, अंंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व हे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ बनला आहे.
- योगेश जंगम
मुंबई : गोरेगाव, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, अंंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व हे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ बनला आहे. या मतदारसंघात यंंदा थेट शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्यामध्ये लढत होणार आहे. या भागातील अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व आणि दिडोशी भागात काही प्रमाणावर उत्तर भारतीयांचे प्राबल्य असले तरी इतर भागांत मराठी टक्का जास्त असल्याने मराठी मते निर्णायक ठरणार आहेत. यामध्ये मनसेची सुमारे एक लाख मते आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विरोध जरी दर्शविला असला तरी या मतदारसंघातील कट्टर वैरी असलेल्या संजय निरुपम यांना विरोध दर्शविल्याने निरुपम यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
सहा विधानसभा मिळून तयार झालेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ८ लाख ९७ हजार २४५ मतदार आहेत. यात ३ लाख ९३ हजार ४३ महिला आणि ५ लाख ४ हजार २०२ पुरुष आहेत. यामध्ये तीन आमदार शिवसेनेचे तर तीन आमदार भाजपचे आहेत. या मतदारसंघामध्ये एकूण चौदा वेळा निवडणुका पार पडल्या यामध्ये नऊ वेळा काँग्रेस खासदार या ठिकाणाहून निवडून आले आहेत. पाच वेळा फक्त सुनील दत्त निवडून आले आहेत.
आघाडी, युतीत थेट लढत
काँग्रेसच्या परंपरेला २०१४ साली छेद दिला. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तिकर निवडून आले. सुमारे दोन लाख मतांनी काँग्रेसच्या गुरुदास कामतांचा पराभव झाला. यामुळे या मतदारसंघामध्ये कीर्तिकर आणि निरुपम यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.
यंदाच्या निवडणुकीमध्ये मनसेचा उमेदवार नसल्याने मराठी मते निर्णायक ठरणार आहेत. मनसेने उमेदवार उभे केलेले नाहीत.