फडणवीसांनी चालवलेली मर्सिडीज 'या' बिल्डरची, काँग्रेसचा सरकारला एकच सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 09:15 AM2022-12-05T09:15:56+5:302022-12-05T09:17:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरवला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमी महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत.
मुंबई - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ट ड्राइव्ह घेतली. दोघांनी एकाच गाडीतून नागपूर ते शिर्डी प्रवास केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रवासाचे सारथ्य करीत ‘स्टेअरिंग’ स्वतःच्या हाती ठेवले. मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते. नागपुरातून दुपारी १२.४५ वाजता प्रवास सुरू झाला आणि ४ तास २९ मिनिटांत, सायंकाळी ५.१४ वाजता ते शिर्डीला पोहोचले. फडणवीस-शिंदेच्या या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाले. त्यानंतर, आता काँग्रेसने या गाडीच्या मालकावरुन सरकारला सवाल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरवला समृद्धी महामार्गाच्यानागपूर ते शिर्डी या ५२० किमी महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. तत्पूर्वी रविवारी शिंदे-फडणवीसांनी या महामार्गावरील झिरो पॉइंटपासून प्रवास केला. फडणवीसांचे समृद्धी महामार्गावर कार चलावतानाचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी, फडणवीसांच्या हाती असलेल्या स्टेअरिंगने आणि कारने नेटीझन्सचे लक्ष वेधले. तसेच, ही कार कोणती आणि कोणाची? असाही प्रश्न अनेकांना पडला. आता, काँग्रेसने ट्विट करत या कारच्या मालकाचं नाव जाहीर करत राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे. तसेच, ही कार बिल्डरची असल्याचंही म्हटंलय.
महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये, फोटोवरून ही गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रकर या नावाने असल्याचं दिसून येत आहे. त्यावरुनच, आता राज्य चालवायला बिल्डरच्या हाती देणार का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बिल्डरची गाडी चालवतायत मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का? pic.twitter.com/2RVJ1Axsog
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 4, 2022
कोण आहेत कुकरेजा
रिअल इस्टेट क्षेत्रातील कुकरेजा इन्फास्ट्रक्चर ही नावाजलेली कंपनी असून मूळ नागपूरमधील आहे. या कंपनीचे चेअरमन विरेंद्र कुक्रेजा हे आहेत. ते सध्या नगरसेवक असून नागपूरच्या जरीपटका प्रभागातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत. १२ वर्षांपूर्वी त्यांच्या या कंपनीने रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आज, कंपनीची कोट्यवधींची उलाढाल आहे.