हायकोर्टाची दया : आठ दरोडे घालणारे दोन तरुण तीन वर्षांत सुटणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 06:35 AM2019-02-18T06:35:20+5:302019-02-18T06:36:31+5:30
हायकोर्टाची दया : सर्व शिक्षा एकत्र भोगण्याची सवलत दिल्यामुळे मिळाला फायदा
मुंबई : दोन वर्षांपूर्वी विदर्भात तुमसर व भंडारा शहरांमध्ये आठ दरोडे घालणाऱ्या आकाश राष्ट्रपाल देशपांडे आणि निकुंज उर्फ निक्की रमेश साधवानी या दोन सराईत गुन्हेगारांना या प्रत्येक गुन्ह्यासाठी झालेली शिक्षा स्वतंत्रपणे न भोगता सर्व शिक्षा एकदम भोगण्याची मुभा उच्च न्यायालयाने दिल्याने या दोघांची प्रत्येकी तीन वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून मुक्तता होईल.
नोव्हेंबर २०१६ मध्ये अटक झाल्यापासून हे दोघे तुरुंगात आहेत. आकाश २१ वर्षांचा तर निक्की २३ वर्षांचा आहे. भंडारा आणि तुमसर येथील दंडाधिकारी न्यायालयांनी यंदाच्या मेमध्ये आकाशला आठ गुन्ह्यांसाठी प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी तर निक्कीला सात गुन्ह्यांसाठी प्रत्येकी ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या सर्व शिक्षा स्वतंत्रपणे भोगल्या असत्या तर एकूण २४ वर्षे शिक्षा भोगून आकाश सन २०४० मध्ये तर निक्की २१ वर्षे गजाआड राहून सन २०३७ मध्ये तुरुंगातून सुटला असता. त्यावेळी ते ४५ वर्षांचे झाले असते. या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगू द्याव्यात यासाठी दोघांनीही याचिका केली. न्या. सुनील शक्रे आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने ती मंजूर केली. त्यामुळे त्यांना सर्व गुन्ह्यांसाठी मिळून तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची एकच शिक्षा भोगावी लागेल.
दंडाधिकाºयांची ८ खटल्यांमध्ये मिळून आकाशला ६५ हजार तर निक्कीला ६० हजारांचा दंड ठोठावला होता. तो न भरल्यास त्यांना प्रत्येकी चार वर्षे आणखी तुरुंगात राहावे लागणार होते. आता त्यांनी दंड भरला तर ते प्रत्येकी तीन वर्षाची शिक्षा भोगून येत्या नोव्हेंबरमध्ये तुरुंगातून सुटतील. अशा प्रकारे निरनिराळ््या शिक्षा एकत्र भोगण्याची सवलत देण्याचा स्वेच्छाधिकार न्यायालयास आहेत. मात्र याची जाणीव व्हावी, यासाठी हा निकाल सर्व न्यायालयांना पाठविण्याचे निर्देशही दिले. आरोपींसाठी अॅड. मिर नगमां अली यांनी तर सरकारसाठी सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर मयुरी देशमुख यांनी काम पाहिले.
तारुण्य तुरुंगात वाया जाऊ देऊ नये
या दोन्ही गुन्हेगारांना दया दाखविताना खंडपीठाने म्हटले, या दोघांनी इतरांना लुबाडून आपला चरितार्थ चालविण्याचा चुकीचा मार्ग निवडला. पण यामुळे तुरुंगवास नशिबी आला व कुटुंब आणि समाजाची साथसोबतही तुटली, याची त्यांना आता नक्कीच जाणीव झाली असणार. सर्व शिक्षा भोगल्या तर आज वयाची जेमतेश विशी ओलांडलेले हे दोघे वयाच्या ४५ व्या वर्षी तुरुंगातून सुटतील. याचीच आम्हाला जास्त खंत वाटते. त्यामुळे शिक्षेच्या सुधारणावादी पद्धतीनुसार आम्हाला शिक्षेच्या बाबतीत उदारपणा दाखविणे भाग पडत आहे. त्यांचे तरुणपण तुरुंगात वाया जाऊ नये असे आम्हाला वाटते.