Milind Deora : "मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार", मिलिंद देवरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 05:48 PM2023-10-15T17:48:59+5:302023-10-15T17:50:06+5:30
मिलिंद देवरा यांनी एक ट्विट करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि मिलिंद देवरा यांची दोन वेळा भेट झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच, मुंबई काँग्रेसमधील गटबाजीमुळे मिलिंद देवरा सध्या नाराज असल्याने राजकारणापासून दूर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान, मिलिंद देवरा यांनी एक ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या चर्चा चुकीच्या असल्याचे स्वतः मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केले आहे. "माझ्या बाबतीत दुसर्या पक्षात सामील होण्याचा विचार करत असल्याच्या खोडसाळ बातम्यांचे मी खंडन करतो. माझा जन्म काँग्रेसमध्ये झाला आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार", असे ट्विट करत राष्ट्रवादी प्रवेशाच्या अफवांवर मिलिंद देवरा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
माझ्या बाबतीत दुसर्या पक्षात सामील होण्याचा विचार करत असल्याच्या खोडसाळ बातम्यांचे मी खंडन करतो.
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) October 15, 2023
माझा जन्म काँग्रेसमध्ये झाला आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार.@INCIndia
मिलिंद देवरा काँग्रेसचे माजी खासदार आहेत. देवरा कुटुंबीय हे पारंपारिक काँग्रेस विचाराचे आहेत. त्यांचे वडिल मुरली देवरा हे दक्षिण मुंबईचे खासदार होते. तसेच, मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. दरम्यान, महाविकास आघाडीने राज्यात एकत्रित निवडणुका लढवण्याचे ठरवले तर मिलिंद देवरा यांची जागा ही शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये दोन भेटी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मिलिंद देवरा हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती.