मिलिंद देवरा यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 01:37 PM2022-08-02T13:37:48+5:302022-08-02T13:38:34+5:30
Milind Deora met Devendra Fadnavis : माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच मुंबईतील नवी प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी केली.
मुंबई - जून महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात सत्तांतर झाले होते. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सत्तेबाहेर जावे लागले होते. दरम्यान, पुढील काही महिन्यांत होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेले शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत. दरम्यान, माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच मुंबईतील नवी प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी केली.
या भेटीबाबत मिलिंद देवरा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. ते म्हणाले की, आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानरपालिका आहे, हे सर्वांना माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या मुक्तपणे आणि निष्पक्षपणे पार पडल्या पाहिजेत. केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग रचनेत फेरफार करणे हे अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे. म्हणून निष्पक्ष निवडणुकीच्या मागणीसाठी आज आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच मुंबई महानगरपालिकेतीन प्रभागांची नवी पुनर्रचना रद्द करावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली, असे मिलिंद देवरा यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली असून, महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या वाढवून २३६ एवढी करण्यात आली आहे. तसेच काही प्रभागांच्या सीमा बदलण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील नवी प्रभाग रचना ही शिवसेनेच्या फायद्याची असल्याचा आरोप काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. तसेच या विरोधात न्यायालयीन लढा लढण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे.