गटबाजीमुळे निवडणूक लढवावीशी वाटत नाही - मिलिंद देवरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:44 AM2019-02-06T06:44:18+5:302019-02-06T06:44:35+5:30
प्रिया दत्त यांच्यापाठोपाठ आता माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरासुद्धा लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची शक्यता आहे.
मुंबई : प्रिया दत्त यांच्यापाठोपाठ आता माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरासुद्धा लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसमधील गटबाजी आणि मतभेदांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक लढवावी असे मला वाटत नाही, असे धक्कादायक विधान देवरा यांनी मंगळवारी एका मुलाखतीत केले आहे.
मुंबई काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून काही दिवसांपूर्वी प्रिया दत्त यांनी आगामी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. आता मिलिंद देवरा यांनीही तशीच भाषा केल्याने काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. मुंबई काँग्रेसमधील प्रॉब्लेम्स आता काही गुपित राहिलेले नाही. मुंबई काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीचे मला वाईट वाटते. आज अनेक काँग्रेस नेते घरी बसून आहेत. आपल्याला का वगळले जात आहे, अशी या नेत्यांची भावना आहे. त्यांना का डावलण्यात येत आहे, हा प्रश्न विचारायला हवा. बाह्या सरसावून हमरीतुमरीवर उतरण्याची मला सवय नाही. शिवाय, काँग्रेसमध्ये तशी पद्धतही नाही. पक्षातील समस्येबाबत मी वरिष्ठांना माझ्या भावना कळविल्या आहेत. आता वरिष्ठच याबाबत निर्णय घेतील, असे सांगतानाच पक्षांतर्गत मतभेदांमुळे निवडणूक लढवावी असे वाटत नाही. याबद्दल मी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना कळविले आहे, असे देवरा यांनी स्पष्ट केले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभाराविरोधात सुरुवातीपासूनच पक्षात नाराजीची भावना आहे. प्रमुख नेत्यांना, त्यांच्या समर्थकांना पद्धतशीरपणे डावलण्यात येत असल्याचा आरोप मुंबईतील बहुतांश नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला होता. स्वत:चा मतदारसंघ सोडून निरुपम यांनी शेजारच्या मतदारसंघावर दावा ठोकला. त्यांच्या आग्रहामुळे गेल्या आठवड्यातील पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत कोणत्याही उमेदवाराबाबत निर्णय होऊ शकला नाही.