"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 09:47 AM2024-05-25T09:47:01+5:302024-05-25T09:52:50+5:30
Jayant Patil : काल खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला दुष्काळावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
Jayant Patil ( Marathi News ) : राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. धरणातील पाणीसाठा तळास गेला आहे. ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छाये खाली आहे. राज्यातील २ हजार २९२ महसूल मंडळापैकी १५०० महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. दरम्यान,काल खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला दुष्काळावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. यानंतर 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्विट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
काल खासदार शरद पवार यांनी दुष्काळाच्या सद्यस्थितीवर मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत भाष्य केले. "राज्यभरात पाण्याची टंचाई सध्या जाणवत आहे. राज्यातील मोठ्या धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील धरणात १० टक्के पाणीसाठा आहे. तर नाशिकमध्ये जिल्ह्यातील धरणांत देखील कमी पाणी शिल्लक राहिले आहे, असंही पवार म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थिती मांडली आणि उपाययोजना करण्याची मागणी केली.
जयंत पाटील काय म्हणाले?
'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला. इलेक्शनच्या मोड मधून सरकार बाहेर पडले असेल तर त्यांनी थोडे इकडे लक्ष द्यावे, "मागील वर्षी हवा तसा पाऊस झाला नाही म्हणून संपूर्ण राज्याला दुष्काळाची झळ बसणार हे आम्ही विरोधक म्हणून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून सांगत आलो आहे. मात्र देशातील आणि राज्यातील राज्यकर्त्यांना निवडणुकांच्या जुळवाजुळवीतून उसंत मिळाले तर याकडे लक्ष दिले जाईल ना, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
"राज्यातील एकूण १९ जिल्ह्यांतील ४० तालुक्यात गंभीर व १६ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. राज्यातील एकूण २२९२ महसूली मंडळापैकी १५३२ महसूली मंडळात दुष्काळ जाहीर केला होता. मात्र आज राज्यातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भाग दुष्काळाच्या छायेत आला आहे, असंही पाटील पोस्टमध्ये म्हणाले.
"राज्यातील धरणांमध्ये १०- २०% इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. उदा. उजनीत ०.० % पाणीसाठा आहे तर जायकवाडीत ५.६५ % आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, निळवंडे, भंडारदरा मध्ये फक्त ९% पाणी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सरकार पाण्याचे टँकरही उपलब्ध करत नाही. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देत नाही. मागे मराठवाड्यात फक्त शोबाजीसाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती का ? असा प्रश्न उद्भवतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी राज्यातील दुष्काळाच्या परिस्थिती बाबत आज पत्रकार परिषद घेतली होती. तसेच काही मागण्याही आदरणीय पवार साहेबांनी सरकारकडे केल्या आहेत. इलेक्शन मोडमधून बाहेर आले असेल तर सरकारने या मागण्यांवर तातडीने लक्ष द्यावे, असंही जयंत पाटील म्हणाले.
इलेक्शनच्या मोड मधुन सरकार बाहेर पडले असेल तर त्यांनी थोडे इकडे लक्ष द्यावे...
मागील वर्षी हवा तसा पाऊस झाला नाही म्हणून संपूर्ण राज्याला दुष्काळाची झळ बसणार हे आम्ही विरोधक म्हणून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून सांगत आलो आहे. मात्र देशातील आणि राज्यातील राज्यकर्त्यांना… pic.twitter.com/rOZvAs8hfb— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 24, 2024