राज ठाकरेंच्या आणखी दोन मागण्या; अजित पवारांनीही प्रश्न तातडीने सोडवण्याचे दिले निर्देश
By मुकेश चव्हाण | Published: October 15, 2020 06:26 PM2020-10-15T18:26:11+5:302020-10-15T18:26:26+5:30
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुबळ्या घटकाला तर खूपच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
मुंबई: महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करण्याची मागणी मनसेने केली आहे. तसेच बचतगटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या दंडेलशाहीविरुद्ध कठोर पावलं उचलावीत ह्यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
सध्या सगळीकडे आर्थिक संकट कमी जास्त प्रमाणात आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुबळ्या घटकाला तर खूपच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गेली अनेक वर्षे महिला बचत गटाद्वारे राज्यातील लाखो महिला या कष्ट करून स्वयंरोजगार निर्मिती करून स्वतःच्या पायावर कष्टाने उभ्या राहत असतानाच कोरोनामुळे मागील 7-8 महिन्यात ही सगळी घडी विस्कळित झाली, या महिला बचतगटांनी मायक्रो फायनान्स कंपनी कडून घेतलेले कर्ज ते वर्षानुवर्षे नियमितपणे फेडत असतांना सध्याच्या काळात या कर्जाची परतफेड ही अशक्य होतं आहे. त्यामुळे संबंधित महिलांचे कर्ज माफ करण्याचे निवेदन मनसेने अजित पवार यांना दिले आहे.
मार्च 2019 पासून पोलीस बांधवांना मिळणारे गृहकर्ज देणे बंद झाले, यात 2500 जणांना हे गृहकर्ज मंजूर होऊन देखील ते प्रत्यक्षात देण्यात आले नाही, त्यामुळे शेकडो पोलीस बांधवांची मोठ्या प्रमाणात आर्थिक तारांबळ होत आहे. याप्रश्नी तातडीने पाऊले उचलून हे गृहकर्ज त्यांना मिळवून देण्याची मागणी देखील मनसेकडून करण्यात आली आहे. मनसेच्या या मागणीनंतर अजित पवार यांनी गृहसचिव सीताराम कुंटे यांना बोलवून घेत हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश दिले, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करावं, बचतगटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या दंडेलशाहीविरुद्ध कठोर पावलं उचलावीत ह्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री @AjitPawarSpeaks ह्यांची भेट घेतली. pic.twitter.com/oymphBoGKG
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 15, 2020
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विविध मागण्या ठाकरे सरकारकडून मान्य केल्या जात आहे. याआधी मुंबईचे डबेवाले राज ठाकरेंना भेटले आणि लगेचच त्यांना रेल्वेने प्रवासाची मुभा देण्यात आली. जिमच्या बाबतीतही तसंच घडलं होतं. तसेच राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यात यावीत, यासाठी ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक मंडळाने अलीकडेच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर राज ठाकरेंच्या पुढाकाराने ग्रंथालयांची दारंही सरकारनं उघडली आहेत. त्यामुळे आता मनसेने केलेल्या वरील दोन मागण्या देखील राज्य सरकार पूर्ण करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या आग्रही मागणीनंतर महाराष्ट्रात सर्वत्र ग्रंथालयं सुरु होणार; विद्यार्थी, पुस्तकप्रेमींसाठी दिलासादायक बाब. https://t.co/CYoScHbi5W
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 14, 2020