मनसेनं भाजपाला भाड्यानं इंजिन दिलंय पण..., 'राजमोर्चा'वर काँग्रेसचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 07:23 PM2020-02-09T19:23:33+5:302020-02-09T19:24:29+5:30
राज ठाकरेंच्या भाषणानंतर शिवसेना आणि काँग्रेसने राज यांच्यावर टीका केली आहे
मुंबई - पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) मुंबईतील आझाद मैदान येथे मोठा मोर्चा निघाला होता. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर या हजारोंच्या उपस्थितीत मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चात मुस्लीम बांधवही उत्स्फुर्तपणे सहभागी होते. मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोर्चातील उपस्थितांना संबोधित केले. मनसेनं मोर्चाला मोर्चानेच उत्तर दिलंय. यापुढे दगडाला दगड आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, असे राज ठाकरेंनी म्हटले. राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे सीएएसला समर्थन असल्याचं दाखवून दिलंय.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर शिवसेना आणि काँग्रेसने राज यांच्यावर टीका केली आहे. मनसेच्या मोर्चावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच, अशा शब्दात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेबद्दल मत व्यक्त केलंय. भूमिका केवळ नफा-नुकसान पाहून घेतल्या की मग मोर्चे काढा वा चिथावणीखोर भाषणे करा, जनतेच्या दृष्टीने त्याची किंमत शुन्य असते. भाजपाच्या धार्मिक द्वेष एक्सप्रेस करिता मनसेनं इंजिन भाड्याने दिले पण इथेही ते फेल होईल... असे ट्विट सावंत यांनी केले आहे.
राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच! भूमिका केवळ वैयक्तिक नफा- नुकसान पाहून घेतल्या की मग मोर्चे काढा वा चिथावणीखोर भाषणे करा जनतेच्या दृष्टीने त्यांची किंमत शून्य असते. भाजपाच्या "धार्मिक-द्वेष एक्स्प्रेस" करिता मनसेने इंजिन भाड्यावर दिले पण इथेही ते फेल होईल!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 9, 2020
राज यांनी आपल्या भाषणात, मोर्चे काढणाऱ्यांना ठणकावून सांगितले की, इतर देशापेक्षा भारताने तुम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे एकोप्याने राहा, देशाशी वाकडं घेऊ नका. हा देश साफ करावा लागेल. केंद्राला कारवाई करावी लागेल. देशातील मुस्लीम हा आमचाच असल्याचंही राज म्हणाले.