शिवसेना पक्ष CM शिंदेंना मिळाला,तेव्हा अजितदादा काय म्हणाले होते?,मनसेने शेअर केला Video
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 09:19 AM2024-02-07T09:19:05+5:302024-02-07T09:20:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या आहे.
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने दिला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
सहानुभूती कसली?; एकनाथ शिंदे निघालेले, पत्रकारांचा तो प्रश्न, गाडी पुन्हा थांबवली, अन्...
खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भातील याचिकेवर काही चाचण्यांनंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या आहे. विविध राजकीय नेते या निर्णयावर आपलं मत मांडत आहे. याचदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील अजित पवारांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का?, असा सवालही उपस्थित केला आहे.
मनसेकडून शेअर करण्यात आलेला अजित पवारांच्या या व्हिडीओ जेव्हा शिवसेना पक्ष, धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं. तेव्हा अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. अरे...ज्यांच्या वडीलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडीलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कवर काढला होता, तो महाराष्ट्राभर पोहचवला, त्यांचाच पक्ष तुम्ही काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं. हा निर्णय जरी निवडणूक आयोगाने दिलेला असला तरी, जनतेला पटलंय का?, याचाही विचार झाला पाहिजे. आणि ज्यांच्यात धमक होती, तर काढा ना वेगळा पक्ष, कोणी अडवलं होतं...असं अजित पवार या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का?
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
वाह रे पट्ठ्या...! 🤨 pic.twitter.com/ZXcOk6y6oy
निकाल नम्रपणे स्वीकारतो-
कोणत्याही पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याची पद्धत आहे. यानुसार आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. आमचे म्हणणे मांडले, इतरांनीही त्यांचे म्हणणे मांडले. लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असते, त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे चिन्ह घडाळ आणि झेंडा आम्हाला मिळाल्या. आमच्या सोबतच्या ५० आमदारांनी जो निर्णय घेतला आहे, त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. विधासभेत अध्यक्षांसमोरही सुनावणी झाली आहे. ते कधी निकाल देतील ते माहिती नाही. ते लवकरात लवकर निकाल देतील अशी अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.
नवीन पिढीला बरोबर घेऊन...
पक्ष पळवल्याचा आरोप विरोध करत आहेत, असा प्रश्न केला असता अजित पवार म्हणाले, पक्ष पळवण्यचा प्रश्नच कुठे येतो? कोण काय बोलतो, त्याचा आम्ही विचार करत नाही. मी कोणाच्याही आरोपाला उत्तर द्यायला बांधील नाही. आयोगाने आमची बाजू खरी मानली. त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर कोर्टात गेलो असतो. आम्ही राज्याची कामे करण्यासाठी इथे आलो आहोत. नवीन पिढीला बरोबर घेऊन राज्यासाठी कामे करत राहू, असंही अजित पवार म्हणाले.