गजानन काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळाला मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 02:25 PM2021-09-08T14:25:09+5:302021-09-08T14:26:00+5:30
आज गजानन काळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई न्यायालयात सुनावणी पार पडली.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आज गजानन काळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई न्यायालयात सुनावणी पार पडली. जस्टिस एस. के. शिंदे यांच्यासमोर गजानन काळे यांची सुनावणी झाली. शिंदे यांनी दोन्ही बाजू ऐकून काळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
गजानन काळे यांच्या पत्नीने विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक हिंसाचार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. सध्या नेरूळ पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात कौटुबिंक हिंसाचार आणि अट्रॉसिटीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे मारहाण करत होते अशी तक्रार त्यांच्या पत्नीने केली आहे. तसेच त्यांचे अनेक स्त्रियांशी विवाहबाह्य संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. गजानन काळे आणि संजीवनी काळे हे २००८ साली विवाहबद्ध झाले.
गजानन काळे यांच्यावरती पत्नीचे गंभीर आरोप-
गजानन काळे यांचे परस्त्रीयांसोबत अनैतिक संबंध असल्याचं अनेक वेळा माझ्या निदर्शनास आलं आहे. त्याला येणारे फोन कॉल, मेसेजवरुन ते लक्षात येतं. मी त्याला वारंवार समजून सांगायचे, पण माझ्या काही पत्रकार मैत्रिणी आहेत. तू याच्यात लक्ष घालू नको, असं म्हणून तो मला मारहाण करायचा, असंही गजानन काळे यांच्या पत्नीने पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.
2008 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही… तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असेही गंभीर आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर केले आहेत.