'अजित पवार यांच्यावरचा अन्याय आता सहन होत नाही'; सुप्रिया सुळेंचं अभिनंदन करत मनसेचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 04:46 PM2023-06-10T16:46:50+5:302023-06-10T16:48:06+5:30
मनसेचे नेते गजानन काळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणासर यावरून चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या आग्रहानंतर पवार यांनी हा निर्णय बदलला होता. परंतु, आज त्यांनी एकप्रकारे आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा राष्ट्रवादीची धुरा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार की सुप्रिया सुळेंकडे सोपविणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांच्या या घोषणेवेळी अजित पवार दिल्लीत उपस्थित होते. याचदरम्यान आता मनसेने अजित पवार यांना डिवचले आहे.
मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये सुप्रिया ताई आणि प्रफुल पटेल यांचं गजानन काळे यांनी अभिनंदन केलं आहे. तसेच पवार साहेबांचा राजकीय वारसदार ठरला म्हणायचा का?, असा ,सवाल उपस्थित करत अजितदादा यांच्यावरचा अन्याय आता सहन होत नाही, असं म्हटलं आहे.
सुप्रिया ताई आणि प्रफुल पटेल यांचं अभिनंदन ...
— Gajanan Kale (@MeGajananKale) June 10, 2023
पवार साहेबांचा राजकीय वारसदार ठरला म्हणायचा का ?
अजित दादा यांच्यावरचा अन्याय आता सहन होत नाही ...!!! #भाकरीफिरवली
दरम्यान, कार्यकारी अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांचे अभिनंदन केले. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली हृदयात महाराष्ट्रनजरे समोर राष्ट्र हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन, असे अजित पवारांनी म्हटले आहे.