'पुढच्या नाराजीपर्यंत या चर्चा बंद करा'; मनसेने लगावला अजित पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 11:31 AM2022-09-13T11:31:33+5:302022-09-13T11:31:44+5:30
अजित पवारांच्या या विधानावरुन मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी टोला लगावला आहे.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं. कारण, कार्यक्रम सुरू असतानाच अजित पवार हे व्यासपीठावरुन तडकाफडकी निघून गेले होते. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता अजित पवार यांनी स्वतःच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी व्यासपीठावरुन नाराज होऊन निघून गेलो नव्हतो, तर वॉशरूमसाठी गेलो होतो, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांच्या या विधानावरुन मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी टोला लगावला आहे. दादा वॉशरूम ला गेले होते रे दादा नाराज नाही आहेत...किती बोंबलून सांगणार...कोणाला पटेल हे की दादा वॉशरूमला गेले हे माहीत होते तरी दादांसाठी थांबावस वाटत नाही यांना...असे कसे चालेल...आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी या चर्चा बंद करा, असं गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दादा वॉशरूम ला गेले होते रे दादा नाराज नाही आहेत ... किती बोंबलून सांगणार ...
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) September 13, 2022
कोणाला पटेल हे की दादा वॉशरूमला गेले हे माहीत होते तरी दादांसाठी थांबावस वाटत नाही यांना ... असे कसे चालेल ... आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी या चर्चा बंद करा ...
दरम्यान, दिल्लीत राष्ट्रवादीचं २ दिवसीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय नेत्यांनी पक्षाची धोरणे आणि कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी मार्गदर्शन केले. मी राष्ट्रीय पातळीवर जास्त भाष्य करत नाही, असं अजित पवार म्हणाले.
मला बोलण्याची संधी दिली परंतु वेळेअभावी बोलता आले नाही. केवळ मी नाही तर सुनिल तटकरे, वंदना चव्हाण आणि ५-६ जणांना भाषण करता आले नाही. शरद पवारांचे ३ वाजता समारोपाचं भाषण सुरू होणार होते. नाराजीच्या बातम्यांना काहीही अर्थ नाही अस सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजीच्या बातमीवर खुलासा केला आहे.