मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
By यदू जोशी | Published: May 22, 2024 10:23 AM2024-05-22T10:23:04+5:302024-05-22T10:25:35+5:30
लोकांनी सभांना गर्दी केली खरी, पण मतदार कौल कोणाला देणार याबाबत व्यक्त होत नव्हता. मतदारांनी थांग लागू न देणे हे नेत्यांचे टेन्शन वाढवणारे ठरले आहे.
यदु जोशी -
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू, भाजपची तगडी प्रचार यंत्रणा, काँग्रेसने कमबॅकचे दिलेले संकेत, उद्धव ठाकरे व शरद पवार या दोन नेत्यांना सहानुभूती मिळत असल्याचे चित्र आणि जातीय समीकरणे या मुद्द्यांभोवती लोकसभेची यंदाची निवडणूक महाराष्ट्रात फिरली. शेतमालाचे भाव, स्थानिक विकासाचे मुद्दे हेही ऐरणीवर होते. सर्वच मोठ्या नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली. मात्र, अनेक लढती ‘घासून’ झाल्याने ४ जूनच्या निकालापर्यंत धाकधूक कायम राहणार आहे.
लोकांनी सभांना गर्दी केली खरी, पण मतदार कौल कोणाला देणार याबाबत व्यक्त होत नव्हता. मतदारांनी थांग लागू न देणे हे नेत्यांचे टेन्शन वाढवणारे ठरले आहे. राज्यात २०१९ प्रमाणेच मोदी लाट होती का? शेतमालाचे भाव, कांदा निर्यात या विषयांचा फटका भाजप व मित्रपक्षांना बसला का? काँग्रेस पुनरागमन करणार का? शरद पवार विरुद्ध अजित पवार या लढाईत बारामतीत विजय कोणाचा होईल? राज ठाकरे महायुतीसोबत आल्याने महामुंबई, नाशिक, पुण्यात किती फायदा झाला? ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा फॅक्टर किती चालला? मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद निवडणुकीत कसे उमटले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ४ जूनच्या निकालात मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम करणारी ही निवडणूक ठरली, यासंदर्भात निकालानंतर सामाजिक कटुता येणार नाही याची काळजी सर्वांनाच घ्यावी लागणार आहे.
एकी दिसली, पण काँग्रेस दमदार कमबॅक करणार का?
२०१९ च्या तुलनेत काँग्रेस अधिक मजबूत वाटली आणि या पक्षातील नेत्यांनी आपसात पाडापाडीचे राजकारण केले नाही, असे सर्वदूर दिसले. राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा समन्वय होता असेही नाही, पण एकमेकांच्या काड्या करणे टाळले गेले. त्या-त्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी वरच्या मदतीवर अवलंबून न राहता किल्ला लढविला. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या दोन-दोनच सभा झाल्या, पण मोठा प्रतिसाद होता.
भाजपची यंत्रणा जोरात
- भाजपची कमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांभाळली. पेजप्रमुखांपासूनचे सूक्ष्म नियोजन हे भाजपचे वैशिष्ट्य. मोठ्या सभांबरोबरच कॉर्नर सभांवर भर देण्यात आला.
- पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी यांनी २०-३० जणांच्या हजारो बैठका घेतल्या आणि नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक कसे आहे, हे समजावून सांगितले. संघ परिवाराने मोठे योगदान दिले. फडणवीस यांनी राज्यात सर्वाधिक ११५ सभा घेतल्या.
शिंदेंची सर्वात मोठी कसोटी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी कसोटी होती, कारण शिवसेना शिंदेंचीच हे त्यांना सिद्ध करायचे आहे. त्यात ते किती यशस्वी झाले हे निकालातून कळेल. सहा महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतरचे त्यांचे राजकीय भवितव्यही या निवडणुकीतून ठरेल.
- भाजपकडून १५ जागा मिळवण्यात ते यशस्वी झाले. पक्षाचे काही सहकारी मंत्री आणि विश्वासू सहकाऱ्यांना जबाबदारी देत आणि भाजप, अजित पवार गटाशी समन्वय साधत त्यांनी स्वत:ही अहोरात्र मेहनत घेतली.
नेत्यांच्या पायाला भिंगरी
प्रचारकाळात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस हे फारतर चार तास झोपायचे आणि पुन्हा प्रचार, निवडणुकीचे विविध प्रकारचे व्यवस्थापन यासाठी कामाला लागायचे.
८३ वर्षांचे शरद पवार हे तिशीतल्या उत्साहाने प्रचारात उतरले. भाजप, मोदी, अजित पवार यांच्यावर त्यांनी प्रतिहल्ले केले. उद्धव ठाकरे यांनी तर निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सभांचा सपाटा लावला. तब्येतीच्या सर्व मर्यादा पार झुगारून देत ते लोकांमध्ये गेले.
उपमुख्यमंत्री अजित पवार काहीसे बारामतीत अडकून पडले पण अन्यत्रही त्यांनी सभा घेतल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपापल्या पक्षाची यंत्रणा कामाला लावली.