"मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकला"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 04:50 PM2023-09-07T16:50:59+5:302023-09-07T16:52:52+5:30

जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे असा आरोप काँग्रेसने केला.

"Modi government has looted the pockets of the people of the country in the last 9 years"- congress | "मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकला"

"मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकला"

googlenewsNext

मुंबई - केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेला फक्त लुटण्याचे काम केले. महागाई प्रचंड वाढवून जनतेच्या खिशावर दरोडा टाकला आहे. डॉ. महमोहन सिंह यांचे युपीए सरकार असताना ३५० रुपये असलेला गॅस सिलिंडर ११०० रुपयेपर्यंत वाढवला व आता २०० रुपये कमी करुन दिलासा दिल्याचे सांगत आहेत ही जनतेची फसवणूक आहे. पेट्रोल-डिझलेच्या किमतीही भरमसाठ वाढवून मोदी सरकारने नफेखोरी केली आहे असा घणाघात काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष नसीम खान यांनी भाजपावर केला.

नसीम खान म्हणाले की, मोदी सत्तेत येण्यापूर्वी २०१४ साली पेट्रोलवर उत्पादन शुल्क ९.४८ रुपये प्रति लिटर होते तर डिझेलवर ३.५६ रुपये होते. मोदी सरकारच्या काळात हा कर वाढवून पेट्रोलवर प्रति लिटर ३२.९८ रुपये तर डिझेलवर ३१.८३ रुपये केले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळी यांच्या किमती प्रचंड वाढल्याने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. शेतकरी, बेरोजगारी, महागाई, कायदा सुव्यवस्थेवर भाजपा बोलत नाही. जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे. या दुषीत वातावरणातच राहुल गांधी यांनी ‘मोहब्बत की दुकान’ सुरु केली आहे. देश, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस, इंडिया आघाडी व राहुल गांधी यांची लढाई सुरु आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आजच्या दिवशी २०२२ साली कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर पदयात्रा काढून भारत जोडण्याचे काम केले. केंद्रातील मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशात केवळ सामाजिक भेदभाव निर्माण करुन देशातील वातावरण गढूळ केले आणि महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट केली आहे. या भिती व दहशतीच्या वातावरणाला छेद देण्याचे महत्वाचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. ‘नफरत छोडो, भारत जोडो’ हा संदेश देत देशाला एकसंध करण्याचे काम केले आहे असं कौतुक त्यांनी केले.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे सर्व निर्णय चुकीचे ठरले आहेत. नोटबंदीचा निर्णय फसला, नोटबंदीने देशातील छोटे, लघु, मध्यम व्यापारी संपले, काळा पैसा आला परत आला नाही, नक्षलवाद, आतंकवाद संपला नाही, त्यामुळे पुलवामा व बालाकोटवरील सर्जिकल स्ट्राईकच्या नावावर मोदींनी मते मागितली. बहुसंख्य हिंदू समाज भाजपा व मोदी यांच्याविरोधात आहे. दक्षिण भारतात भाजपा कुठेच नाही, पश्चिम बंगाल, बिहारमध्येही नाही. भाजपा हा फक्त गुजरात व उत्तर प्रदेश राज्यापुरताच मर्यादित राहिला आहे असा टोला खासदार कुमार केतकर यांनी लगावला.

Web Title: "Modi government has looted the pockets of the people of the country in the last 9 years"- congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.