मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, अजित पवार यांचा महिला मेळाव्यात निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 09:56 AM2024-01-19T09:56:17+5:302024-01-19T09:57:05+5:30
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचा महिला मेळावा गुरुवारी येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला.
मुंबई : नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. महिलांनी जास्तीत जास्त मतदान केल्याने तीन राज्यांत भाजपची सत्ता आली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला महायुतीच्या माध्यमातून सामोरे जायचे असून त्या पद्धतीने कामाला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केले.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचा महिला मेळावा गुरुवारी येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. यावेळी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळ, अदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ आदी उपस्थित होते.
आपला निर्णय पक्षाच्या हिताचा
मी शब्दाचा पक्का आहे. माझे काम रोखठोक असते. एकदा निर्णय घेतला की, त्यापासून बाजूला जायचे नाही. आपल्याला सर्व घटकांना बरोबर घेऊन वाटचाल करायची आहे, असे ते म्हणाले. ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांना धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावे, अशी पक्षाची भूमिका असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.