विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे, आजपासून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 08:02 AM2023-07-17T08:02:45+5:302023-07-17T08:07:36+5:30
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांची पत्रकार परिषद झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यावर विरोधकांनी आत्मविश्वास गमावला असून आपल्या कामातून आपण त्यांना उत्तर देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारला. तर राज्यात लोकशाहीच शिल्लक राहिली नसल्याची टीका विरोधकांनी केली.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही कोणालाही विरोध करणार नाही. आलेल्या प्रत्येक लक्षवेधीला आमचे मंत्री उत्तरे देतील.
किती विधेयके मांडली जाणार?
n अधिवेशनात २४ विधेयके व ६ अध्यादेश मांडले जाणार आहेत. महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक राज्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
n त्याचप्रमाणे राज्यातील एसआरए प्रकल्पांसंदर्भातील महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक, महानगरपालिका विधेयक, मुंबई महानगरपालिका विधेयक, विद्यापीठासंदर्भातील विधेयके, महाराष्ट्र माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार विधेयक, महाराष्ट्र कॅसिनो विधेयक या महत्त्वाच्या विधेयकांचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे अध्यादेशांमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत व जिल्हा परिषद अध्यादेश, महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक अध्यादेश, महाराष्ट्र सहकारी संस्था अध्यादेश यासारखे महत्त्वाचे अध्यादेश मांडले जाणार आहेत.
चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांची बैठकही विधानभवनात झाली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. राज्यातील सरकारला संविधानाची मान्यता नाही. हे घटनाबाह्य सरकार आहे, अशी टीका विरोधकांनी केली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधकांचे संख्याबळ घटले असले तरी विरोधक एकसंघ आहेत, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.