काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 06:19 AM2024-10-09T06:19:14+5:302024-10-09T06:19:49+5:30
रमेश चेन्नीथला म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुती सरकारचा एकजुटीने पराभव करेल.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हरयाणा विधानसभा निवडणुकीतील निकालाचा राज्यातील काँग्रेसच्या मनोबलावर कोणताही परिणाम होणार नाही, या निकालाने आमचे कार्यकर्त्यांचे मनोबल खचणार नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र आणि हरयाणातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. या निकालाने आमचे मनोबल खचलेले नसून आम्ही अधिक जोमाने काम करू. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुती सरकारचा एकजुटीने पराभव करेल.
महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा आणि ते नवीन सरकार आणण्याच्या मानसिकतेत आहेत. आम्ही खंबीर आहोत आणि लवकरच आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करू. राज्यातील सरकार हे पक्ष फोडून तयार केलेले आहे, हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, असेही चेन्नीथला म्हणाले.
भाजपशी थेट लढत झाली की काँग्रेस कमकुवत होते
सरकारविरोधी वातावरणानंतरही भाजप हरयाणात सरकार स्थापन करत असेल तर मी त्यांचे अभिनंदन करू इच्छिते. भाजपप्रती लोकांमध्ये नाराजी होती, पण लोकांनी त्यांनाच मतदान केले. काँग्रेस पक्षाला आता आपली रणनीती तपासून पाहावी लागेल. भाजपशी थेट लढत झाली की काँग्रेस कमकुवत होते. काँग्रेसने याचा विचार करून आपली रणनीती सुधारावी. - प्रियांका चतुर्वेदी, खासदार, उद्धवसेना
प्रत्येक निवडणुकीची वेगळी कारणे असतात. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असते. - सुप्रिया सुळे, खासदार, शरद पवार गट
इतर राज्यातील निकालाचा परिणाम कार्यकर्त्यांवर होतो. परंतु महाराष्ट्राची निवडणूक वेगळी आहे. राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे. उद्योग बाहेर जात आहेत. शेतकरी आत्महत्या कुणीही विसरू शकत नाही. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.